Nitesh Rane: न्याय मिलेगा! खेल आपने शुरू किया है, खतम हम करेंगें; नितेश राणेंचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 02:23 PM2022-03-05T14:23:41+5:302022-03-05T14:24:18+5:30
Nitesh Rane: दिंडोशी न्यायालयाने राणे पिता-पुत्रांना अटक न करण्याचे निर्देश दिले होते.
मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनबाबत बदनामीकारक विधाने करून दिशाभूल केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र नीतेश राणे यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने १० मार्चपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. मात्र, यानंतर नारायण राणे (Narayan Rane) आणि नितेश राणे यांनी (Nitesh Rane) मालवणी पोलीस ठाण्यात हजेरी लावली. यापूर्वी नितेश राणे यांनी एक ट्विट करत सूचक वक्तव्य केले आहे. न्याय मिळेल, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल झालेले भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपूत्र नितेश राणे यांचा आता पोलिसांकडून जबाब नोंदवला जाणार आहे. नितेश राणे यांनी एक सूचक ट्विट केले आहे. खेल आपने शुरू किया है, खतम हम करेंगें. न्याय मिलेगा!, असे नितेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमधून नितेश राणे यांना ठाकरे सरकारला एकप्रकारे इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अटकपूर्व जामीन अर्ज
अटकेच्या भीतीने नारायण राणे व नीतेश राणे यांनी दिंडोशी सत्र न्यायालयात ॲड. सतीश मानेशिंदे यांच्याद्वारे अटकपूर्व जामीन अर्ज केला. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायालयाने राणे पिता-पुत्रांना अटक न करण्याचे निर्देश देत विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, नारायण राणे आणि नितेश राणे या दोघांना सीआरपीसी कलम ४१(ए) अंतर्गत नोटीस बजावून जबाब नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. मालवणी पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यानुसार, १९ फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशा सालियनच्या मृत्यूबाबत काही वक्तव्ये केली. या पत्रकार परिषदेत नीतेश राणेही उपस्थित होते.