मुंबई- राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपाने तिसरा उमेदवार दिला तरी माझे लक सुरु आहे, महाविकास आघाडी सरकार या शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून आणेल, असे संजय पवार यांनी सांगितले. याचबरोबर,जो विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दाखवलेला आहे, तो सार्थ ठरवेन. छत्रपती हे आमचे दैवत आहेत, मी संभाजीराजेंना भेटणार आहे. चर्चेत नाव असणे आणि नाव फायनल होणे यात खूप फरक आहे. मी पण मराठा आहे, समाजाच्या प्रत्येक आंदेलनात मी होतो, असे संजय पवार म्हणाले.
विधानसभेच्या २८८ सदस्यांमधून राज्यसभेत निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात. शिवसेनेकडून संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित होती, मात्र दुसऱ्या जागेसाठी पक्षाकडे अनेक पर्याय होते. त्यातच पुरस्कृत म्हणून महाविकास आघाडीने पाठबळ द्यावे, असा माजी खासदार संभाजीराजे यांचा प्रयत्न होता. मात्र शिवसेनेने नकार देत अनपेक्षितपणे संजय पवार यांचे नाव पुढे केले.
"भाजपने तिसरा उमेदवार दिला तरी..."; संजय पवार, राऊत यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल
संभाजीराजेंना शिवसेनेची ४२ मते देण्यासाठी तयार होतो. ही जागा शिवसेनेची आहे, तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा ही आमची अट नव्हती तर भूमिका होती. छत्रपती किंवा राजघराण्याला राजकीय पक्षाचे वावडे नसावे. मोठ्या महाराजांनी शिवसेनेत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मालोजीराजे, स्वत: संभाजीराजे राष्ट्रवादी, भाजपा आदी पक्षांकडून निवडणुका लढले आहेत. आमदार खासदार राहिले आहेत. यामुळे त्यांच्या समर्थकांचे दावे खोटे आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले.
मराठा मोर्चाकडून संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारण्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला आहे. अनेक राजकीय नेत्यांतूनही विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. याचदरम्यान आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवावे, ते छत्रपती आहेत. त्यांना मान खाली घालायला लावू नये, असा निर्णय घ्यायला हवा तसेच त्यांचा संभाजीराजेंचा मान राखायला पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
Rajya Sabha Election: संभाजीराजेंची माघार शक्य!, दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांची मंगळवारी रात्री बैठक झाली. यामध्ये संभाजीराजेंचा प्रस्ताव, भाजपची भूमिका आणि चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठीची रणनीती याबाबत चर्चा झाली. अखेर शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहिली आणि संजय पवार यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. रात्रीच पवार यांना पक्षाचा अधिकृत ए व बी फॉर्म देण्यात आला. बुधवारी दिवसभर संजय राऊत व संजय पवार यांच्या उमेदवारी अर्जांसोबत लागणारी कागदपत्रे तयार करण्याचे काम सुरू होते. गुरुवारी दुपारी एक वाजता राऊत व पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
संजय पवार गेली ३० वर्षे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते-
संजय पवार गेली ३० वर्षे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. महापालिकेचे माजी नगरसेवक ते आता थेट राज्यसभेचेच संभाव्य उमेदवार अशी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची चढती कमान आहे. खरे तर त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याचे या उमेदवारीसाठी पक्षाकडून नाव चर्चेत येणे हाच मोठा बहुमान असल्याची भावना शिवसेनेतून व्यक्त होत आहे.