मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेने राज्यात सत्तास्थापन केली आहे. भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही असं सांगत शिवसेनेने भाजपापासून फारकत घेतली. मुख्यमंत्रिपद कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा भाजपाने घेतला. त्यामुळे मागील २५ वर्षांची युती तुटली.
मात्र या सर्व राजकीय नाट्यामध्ये भाजपाला राज्यातील सत्ता गमवावी लागली. सरकार गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील पक्षांतर्गत नाराजी समोर येत असल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीला एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर नाराजी व्यक्त करत सिंचन घोटाळ्याचे पुरावे आम्ही रद्दीला विकले तसेच जर राज्यातील नेतृत्वाने विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे, मला सोबत घेऊन पुढे गेले असते तर किमान भाजपाच्या २५ जागा निवडून आल्या असत्या अशा शब्दात टीका केली.
एकनाथ खडसेंपाठोपाठ भाजपातील आणखी एक चेहरा असलेल्या पंकजा मुंडेही सध्या भाजपात नाराज असल्याचं बोललं जातं आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या, पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं, हे ठरविण्यासाठी येत्या १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर येण्याचं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे १२ डिसेंबरला पंकजा मुंडे कोणता मोठा निर्णय करणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे.
काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरुन भाजपा नावाचा उल्लेख वगळून टाकला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपा सोडणार अशीही चर्चा सुरु आहे. सध्या पंकजा मुंडे आणि बहुजन समाजातील काही लोकप्रतिनिधी मिळून वेगळा गट तयार करण्यावर एकमत झाले आहे असल्याची माहिती आहे. तर आजच्या सामना अग्रलेखात शिवसेनेने केलेल्या वक्तव्यामुळेही अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
सामना अग्रलेखात म्हटलं की, भाजपाने बहुजन समाजाचा चेहरा गमावला आहे व जनता त्यांच्यापासून दूर गेली आहे. आज विरोधी पक्ष म्हणून जो आकडा त्यांच्या भोवती दिसत आहे, तो टिकवणे यापुढे अवघड जाईल असे वातावरण आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाने पार पाडली असती तर आम्ही जे सांगतो त्यावर मोहोर उठली असती. 170 चे बहुमत साधे नाही व उद्या हा आकडा 185 पर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जे घडले आहे व घडू पाहत आहे तो सर्व प्रकार म्हणजे भाजपाचे ‘कर्मफळ’ आहे. असं सांगितलं आहे.
पंकजा मुंडे, एकनाथ खडसे हे भाजपातील बहुजनांचा चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात पंकजा मुंडे यांनी रणनीती आखली आहे की विधान परिषदेत आमदारकीसाठी पक्षावर दबावतंत्र वाढविण्याचा हा प्रकार आहे का? हे आगामी काळात स्पष्ट होईल. पण तुर्तास पंकजा मुंडे १२ डिसेंबरला काय भाष्य करतात यावर सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.