आठवडी बाजारावरील कारवाई थांबत नाही तोपर्यंत संघर्ष कायम राहणार; प्रसाद लाड यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 09:06 PM2021-03-07T21:06:13+5:302021-03-07T21:08:39+5:30
फेरीवाले आणि या आठवडी बाजारात येऊन थेट विक्री करणारे शेतकरी यांच्याकडून हप्ते मिळत नसल्याने ते बंद करण्याचा घाट घातला जात आहे," असा आरोप प्रसाद लाड यांनी केला.
राज्यात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना आठवडी बाजार सुरू करण्यात आले होतं. परंतु लालबाग येथील आठवडी बाजारावर सुरू करण्यात आलेल्या कारवाईला भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे आणि स्थानिक नेत्यांकडून विरोध करण्यात आला. तसंच त्यांनी यावेळी प्रशासनाचा निषेधही केला. लालबाग येथील आठवडी बाजाराला भेट देत त्यांनी हे बाजार जनतेच्या हितासाठी कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहतील, अशी ठाम भूमिकाही घेतली होती.
"तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आठवडी बाजार सर्वसामान्यांना स्वस्त आणि ताजा भाजीपाला व फळे मिळावीत आणि त्याचवेळी शेतकऱ्यांना त्यांच्या कृषीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सुरु करण्यात आले होते. मध्यस्थांची कृषीमाल विक्रीमधील मक्तेदारी नष्ट व्हावी म्हणून हे आठवडी बाजार मुंबईत ठिकठिकाणी सुरु करण्यात आले आहेत. मात्र शिवसेनेच्या राज्यात त्यांच्या अधिपत्याखालील मुंबई महानगर पालिकेने या आठवडी बाजारांना परवानगी देणे बंद केले असून हे बाजार बंद पडावेत म्हणून प्रयत्न होत आहेत. फेरीवाले आणि या आठवडी बाजारात येऊन थेट विक्री करणारे शेतकरी यांच्याकडून हप्ते मिळत नसल्याने ते बंद करण्याचा घाट घातला जात आहे," असा आरोप प्रसाद लाड यांनी केला.
आमचा संघर्ष सुरूच राहणार
“आठवडी बाजारांद्वारे लोकांना आपल्या घराजवळ ताज्या भाज्या स्वस्तात मिळतात. सर्वसामान्य जनतेने या संकल्पनेला उत्तम पाठिंबा दिला आहे. अडते, मध्यस्थ, कृषीउत्पन्न बाजार समित्या हे सर्व मधले घटक नाहीसे झाल्याने शेतकरी आणि ग्राहक हा थेट दुवा साधला गेला होता. तो नष्ट करण्याचे काम हे नतद्रष्ट राजकारणी करत आहेत. परंतु शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. आम्ही कोणत्याही परिस्थितीत हे आठवडी बाजार बंद होऊ देणार नाही. जोपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होणारी कारवाई थांबत नाही, तोपर्यंत आम्हीहा संघर्ष सुरु ठेवू,” असे आमदार नितेश राणे म्हणाले.
पंतप्रधानांकडूनही कौतुक
"सर्वसामन्य मुंबईकरांना ताज्या आणि स्वस्त भाजीपाला आणि फळांपासून वंचित राहावे लागत आहे. गेली पाच वर्षे अतिशय उत्तमरीत्या चाललेले हे आठवडी बाजार लोकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोगी यांनीदेखील या आठवडी बाजारांचे आणि त्यामागील संकल्पनेचे तोंडभरून कौतुक केले होते,” असेही लाड यांनी यावेळी सांगितलं.