"पंतप्रधान युद्धभूमीवर पोहोचले, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोकणातही जाऊ शकले नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 09:17 PM2020-07-03T21:17:17+5:302020-07-03T21:23:33+5:30
भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एक ट्विट करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अचानक लेह दौरा करुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. नरेंद्र मोदींनी लेह लडाख सीमारेषेवर जाऊन देशातील जवानांचे मनोबल वाढविण्याचं काम केलें आहे. तसेच भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा लेह दैरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. नरेंद्र मोदींच्या याच दौऱ्यावरुन भाजपाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एक ट्विट करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. प्रवीण दरेकर म्हणाले की, देशाचे पंतप्रधान लेह युद्धभूमीवर पोहचले, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोकणात देखील जाऊ शकलो नाही.
देशाचे PM लेह युध्दभुमीवर पोहचले, पण महाराष्ट्राचे Best CM कोकणात देखील नाही जाऊ शकले!!!
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 3, 2020
तत्पूर्वी, भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत-चीन दरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली होती. चीनबाबत केंद्र सरकार घेत असलेल्या भूमिकेवरून विरोधी पक्षाने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लेह युद्धभूमीवर जाऊन भारतीय सैन्याची भेट घेऊन त्यांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.
देशातील 130 कोटी भारतीयांच्या सन्मानाचा हा पराक्रम आहे, देशासाठी बलिदान देणाऱ्या राष्ट्रभक्तांची ही भूमी आहे. आपण त्याच भारतमातेचे वीर आहात, ज्या भारतमातेने आजपर्यंत हजारो आक्रमकांना चोख प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्र आणि मानवतेच्या प्रगतीसाठी शांतीप्रिय असणे गरजेचं असतं. भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण कुणी आम्हाला डिवचलं तर, उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत, असे म्हणत थेट सीमारेषेवरुनच चीनला नरेंद्र मोदींनी स्पष्ट संदेश दिला आहे.
दरम्यान, कोकणात चक्रीवादळ आल्यानंतर येथील नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी रायगडचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी रायगडसाठी आर्थिक मदतीची घोषणाही केली होती. त्यानंतर ते कोकण दौऱ्यावर जाणार होते. मात्र, हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उद्धव ठाकरेंना कोकणातील मदत वाटपाचा दौरा रद्द करावा लागला होता.