मुंबई: राज्यात कोरोना व्हायरससारखं महाभयंकर संकट असताना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचं निवास्थान असलेल्या मातोश्रीबाहेर पडत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच राज्यभरात आज जो विस्कळीतपणा सुरु आहे, तो याआधी कधीच नव्हता असं प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
प्रवीण दरेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, काही अपवाध वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; पती- पत्नीने खातं उघडल्यास दर महिन्याला मिळेल दुप्पट फायदा
कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले. पूर्ण कोकण उध्दवस्त झाले. पण मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ मिळाला नाही. सांगलीला महापूर आला, सातारा, कोल्हापूर पाण्याखाली गेले, काल परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाहीत, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितले. कोरोना संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी आम्ही सर्व नेते मंत्रालयात दाखल झालो. तर मुख्यामंत्री, मुंबईतल्या मुंबईत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर बोलत होते, असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
आदित्य ठाकरेंनी ट्विटर प्रोफाइलवरून 'मंत्री' ही ओळख हटवली?; जाणून घ्या सत्य
दरम्यान, पुण्यात टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीमधील पाडुरंग रायकर या पत्रकाराच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबाबतही प्रवीण दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर चौकशी कशाला लावताय? कोरोना सेंटर उभं केलं पण त्यामध्ये यंत्रणाच नसेल तर उपयोग काय ,असे सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केले आहे.
पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पांडुरंग रायकर यांना २० ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास झाला. त्यानंतर डॉक्टरांकडे त्यांच्यावर उपचार सुरु होते. २७ ऑगस्टला त्यांनी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर पुण्यातून ते आपल्या मूळ गावी कोपरगावला गेले.
गावी गेल्यानंतरही पांडुरंग यांना त्रास झाल्यामुळे त्यांची पुन्हा अँन्टीझेन चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रविवारी ३० ऑगस्टला पांडुरंग रायकर यांना कोपरगावहून पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये पांडुरंग यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र परिस्थिती खालावत गेली. जम्बो हॉस्पिटलमधून खासगी हॉस्पिटलला शिफ्ट करण्यासाठी त्यांना कार्डिअक रुग्णवाहिकेची गरज होती. पण व्हेटिंलेटर खराब असल्याने रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याचे विरोधकांकडून राज्य सरकारव टीका करण्यात येत आहे.