मुंबई- एकीकडे पक्षातील खासदार, आमदार, नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत असताना दूसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज शिवसेना भवनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना विविध कामे दिली आहेत. त्यातलं एक म्हणजे मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.
जनतेच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती आहे. त्याचा शिवसेना वाढीसाठी उपयोग करा, ही आलेली संधी आहे. तुम्हाला आता एकच काम देतोय, ते म्हणजे नोंदणी. नोंदणीचे गठ्ठेचे- गठ्ठे घेऊन या, असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. तसेच गटप्रमुख आणि शाखाप्रमुखांना घेऊन काम करा, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या या सूचनेनंतर शिवसैनिक कामाला लागल्याचे दिसून येत आहे. मात्र यावर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. तुम्ही सत्ता असताना लोकांमध्ये गेले असते, विविध ठिकाणी फिरले असते, तर आज गठ्ठे गोळा करण्याची वेळ आली नसती, असं प्रवीण दरेकर म्हणाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमागे गणपती बाप्पा उभे असून ही जोडी राज्याला दिशा देईल, असा विश्वासही प्रवीण दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
मला वाढदिवसाला भेट द्यायची असेल तर मला फुलांचे गुच्छ नकोत. मला सदस्यांच्या अर्जांचे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे हवेत. याचं कारण आता त्यांनी प्रोफेशनल एजन्सी कामाला लावल्या आहेत. ही लढाई पैसा विरुद्ध निष्ठा अशी आहे. तुम्ही कितीही पैसा ओतला तरी हे माझं शिवसैनिकांचं वैभव त्यांना पुरुन उरेल, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाला दिला. फक्त शिवसेना फोडण्याची त्यांची चाल नाही तर मराठी माणूस आणि हिंदुत्वाचा भगवा फोडण्याची त्यांची चाल आहे, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
दरम्यान, माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, पण धनुष्य हे माझ्याकडे आहे, लक्षात ठेवा. शिवसेनेत बंडखोरांनी फूट पाडली नाही तर ती भाजपाने पाडली आहे. भाजपाच शिवसेनेला संपवत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच सध्या शिवसेनाचा कठीण काळ सुरु आहे. मात्र संघर्षाला ठाकरे घाबरत नाही. हे दिवसही जातील, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना व्यक्त केला आहे.