'ठाकरे सरकारने बडवलेला ढोल दूसऱ्या दिवशीच फुटला'; प्रवीण दरेकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 06:14 PM2022-05-23T18:14:41+5:302022-05-23T18:15:01+5:30
भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबई- पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात करुन केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ७ आणि ६ रुपये प्रतिलीटर कपात केली. केंद्राच्या घोषणेनंतर राज्य सरकारनेही काल व्हॅटमध्ये कपात करण्याची घोषणा केली. व्हॅटमध्ये अनुक्रमे २.८ आणि १.४४ रुपये प्रतिलीटर कपात केली. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने मात्र जनतेला फसवण्याचे काम केले, असा आरोप भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
प्रवीण दरेकर ट्विट करत म्हणाले की, केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर कमी करुन भारतवासियांना दिलासा दिला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने मात्र जनतेला फसवण्याचे काम केले. इंधनावरील व्हॅट कमी केल्याची घोषणा तर महाविकास आघाडी सरकारने केली, पण शासनाने आदेश काढलाच नाही, असं दरेकर म्हणाले.
आदेश काढताही आला नसता सरकारला, कारण सरकारने व्हॅट कमी केलेलाच नाही. महाविकास आघाडी सरकारमुळे नाही तर केंद्र सरकारमुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले. कारण, केंद्राने अबकारी कर कमी केल्यानंतर राज्यातील इंधनावरील कर आपोआपच कमी होतो. त्यासाठी राज्यसरकारला वेगळा निर्णय घ्यावा लागत नसतो.
इंधनावरील व्हॅट कमी करण्याचा ढोल ठाकरे सरकारने बड-बड बडवला, पण आवाज काही आला नाही आणि दुसऱ्या दिवशी तर ढोलच फुटला. दिलासा देणे दूर... राज्यातील जनतेची दिशाभूल करुन त्यांच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका, अशी टीका प्रवीण दरेकरांनी महाविकास आघाडीवर केली आहे.
असा आदेश काढताही आला नसता सरकारला, कारण सरकारने व्हॅट कमी केलेलाच नाही. महाविकास आघाडी सरकारमुळे नाही तर केंद्र सरकारमुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले. कारण, केंद्राने अबकारी कर कमी केल्यानंतर राज्यातील इंधनावरील कर आपोआपच कमी होतो. त्यासाठी (2/3)
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 23, 2022
दरम्यान, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. लज्जास्पद. महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.