मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणच्या कावसानकर मैदानावर आज जाहीर सभा होणार आहे. याचदरम्यान कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यकर्त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच अडीचशे ते ३०० रुपये देऊन महिलांना सभेसाठी आणण्यात आले, असे देखील संभाषण क्लीपमध्ये आहे. ही ऑडिओ क्लिप कधीची आहे? आताची आहे की जुनी आहे? याबाबत खात्रीशीर माहिती नाही. मात्र, शिंदे गटाकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत.
सभेला गर्दी जमावी यासाठी पैसे वाटल्याचं संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. या ऑडिओ क्लिपबाबत शिंदे गटाकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. ही ऑडिओ क्लिप बनावट आहे. कोणी तरी मुद्दाम बनवून ही क्लिप व्हायरल केल्याचं शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
सदर प्रकरणावर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री जेथे जातात तेथे सरकारी यंत्रणा ही येतच असते. त्यांच्या विविध कामासंदर्भात सहभागी होण्यासाठी व सभेसाठी माणसं गोळा करण्याची शिंदे यांना अजिबात गरज नाही, असं प्रवीण दरेकरांनी सांगितलं. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून महाराष्ट्रातील जनतेचा जनाधार त्यांच्यामागे उभा राहत आहे. रात्री दोन- अडीच वाजता त्यांच्या स्वागताला लोक येतात यावरून त्यांना भाड्याने माणसं घेऊन यायची गरज नाही हे सिद्ध होतं, असंही प्रवीण दरेकर म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे शिवसेनेतील महत्त्वाचे नेते समजले जात होते. मात्र त्याच शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी करून वेगळा गट तयार केला आहे. आता बाळासाहेबांनी घेतलेल्या मैदानावर त्यांची सभाही होतेय. दरम्यान दसऱ्या मेळाव्यात शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची सभा होणार यावरून वाद सुरू आहे. पण त्याआधीच बाळासाहेबांनी गाजवलेल्या मैदानावर आता एकनाथ शिंदेंचं भाषण गाजणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलाय.
सभेला अर्ध्या डझनपेक्षा अधिक मंत्री-
पैठण येथे होत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सभेला शिंदे गट आणि भाजप मधले अनेक मंत्री हजेरी लावणार आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे,रोहयो मंत्री संदिपान भुमरे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यासह आणखी काही मंत्री या सभेला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.