"प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष अन् शेवटी स्वतः"; भाजपाने मानले उद्धव ठाकरेंचे आभार
By मुकेश चव्हाण | Published: July 13, 2022 04:52 PM2022-07-13T16:52:06+5:302022-07-13T16:55:01+5:30
भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे.
मुंबई- राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेनं कधीच कोत्या मनानं वागलेली नाही. शिवसेनेनं याआधीही पक्षीय अभिनिवेशन बाजून ठेवून प्रतिभाताई पाटील, प्रणब मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाचं भाजपाकडून स्वागत करण्यात आलं आहे. भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंचे अभिनंदन आणि आभार मानले आहे. पक्षापेक्षा देशहिताला प्राधान्य म्हणून उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना समर्थन जाहीर केले. "प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः" या भाजपाच्या तत्वाला अनुसरून त्यांनी दिलेल्या समर्थनाबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार, असं प्रवीण दरेकर यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
पक्षापेक्षा देशहिताला प्राधान्य म्हणून मा. @OfficeofUT जी यांनी भाजपाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना समर्थन जाहीर केले. "प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः" या भारतीय जनता पार्टीच्या तत्वाला अनुसरून त्यांनी दिलेल्या समर्थनाबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार.#DraupadiMurmu
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 12, 2022
एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची संधी मिळत आहे तर आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी भावना खासदारांनी व्यक्त केली होती. त्याचा सन्मान करत शिवसेनेनं राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. माझ्यावर खासदारांनी कोणताही दबाव आणलेला नाही. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्म यांना दिलेला पाठींबा शिवसेना भाजप युतीच्या दृष्टिने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. शिवसेनेकडून एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठींबा देण्याचे जाहीर केले. हे शिवसेना भाजपा युतीच्या दृष्टिने एक मोठे पाऊल टाकले आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.
हेच सर्व खासदार आमदार आणि शिवसैनिकांचे मत आहे. त्यांनाही या निर्णयाने बरे वाटले असेल, असेही केसरकर यांनी सांगितले. बुधवारी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीसाठी मला व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित केले असून हा खरोखरच माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण असल्याचे यावेळी दीपक केसरकरांनी सांगितलं.