Pravin Darekar : 'मविआ'ला आणखी एक धक्का; मुंबई बँकेतही सत्तांतर, अध्यक्षपदी प्रवीण दरेकरांची निवड!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 02:38 PM2022-08-05T14:38:42+5:302022-08-05T14:40:06+5:30
Pravin Darekar : भाजपचे प्रवीण दरेकर यांची मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे.
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का देत शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मात्र, महाविकास आघाडीला अद्यापही धक्के मिळतच आहेत. आता मुंबईबँकेतही सत्तांतर झाले आहे. भाजपचे प्रवीण दरेकर यांची मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे.
मुंबई बँकेचे संचालक सिद्धार्थ कांबळे यांनी गेल्या आठवड्यात आपल्या अध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला. तर विठ्ठल भोसले यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यामुळे आता प्रवीण दरेकर हे अवघ्या सहा महिन्यांमध्ये मुंबई बँकेच्या अध्यक्ष पदावर पुन्हा विराजमान झाले आहेत. तर उपाध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे. सहकार क्षेत्रात मुंबई बँक ही प्रमुख बँकेपैकी एक असून प्रवीण दरेकर यांचे या बँकेवर वर्चस्व आहे. सहा महिन्यांपूर्वी प्रवीण दरेकर यांना धक्का देत महाविकास आघाडीने बँक ताब्यात घेतली होती. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकार येताच पुन्हा सत्तांतर झाले आहे.
दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी प्रवीण दरेकर यांना धक्का देत महाविकास आघाडीने बँक ताब्यात घेतली होती. त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वत: मागील निवडणुकीची सुत्रे हाती घेत भाजपच्या प्रवीण दरेकरांना धक्का दिला होता. त्यावेळी महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले होते, त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला होता. सिद्धार्थ कांबळे यांना 11 मते मिळाली होती तर भाजपच्या प्रसाद लाड यांना 9 मते मिळाली होती. प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून खोट्या कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढवली असल्याचा ठपका सहकार विभागाने ठेवला होता. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून ते दूर होते.
मुंबई बँक प्रकरण काय?
प्रत्यक्षात मजूर नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे मजूर असल्याचे दाखवून आणि १९९९ पासून २०२१ पर्यंत मुंबई बँकेच्या संचालक मंडळावर मजूर प्रवर्गातून निवडून येऊन नागरिकांबरोबरच सरकारचीही फसवणूक केली, अशा आरोपाखाली प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती.