Pravin Darekar On Sanjay Raut : हा पिक्चर ट्रेलरमध्येच फ्लॉप गेलेला दिसतोय; प्रवीण दरेकरांचा राऊतांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 05:25 PM2022-02-15T17:25:49+5:302022-02-15T17:26:12+5:30
Pravin Darekar On Sanjay Raut : मंगळवारी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजवर गंभीर आरोप केले.
Pravin Darekar On Sanjay Raut : मंगळवारी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजवर गंभीर आरोप केले. केंद्रीय तपास यंत्रणेकडून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर धाडसत्र, छापे सुरू आहेत. केंद्र सरकारकडून महाविकास आघाडीचे सरकार पडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचंही राऊत म्हणाले. यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत या पिक्चरचा ट्रेलरच फ्लॉप झाल्याचं म्हणत राऊतांना टोला लगावला.
"जिकडे करायला पाहिजे तिकडे काही करायचं नाही. यांना फक्त इव्हेंट करायचंय, भावनिक वातावरण तयार करायचं, लोकांना डायव्हर्ट कसं करायचं यापुढे त्यांच्या आरोपात काडिमात्र तथ्य नाही," असं दरेकर यावेळी म्हणाले. यावेळी राऊत यांनी भाजपच्या मोहित कंबोज यांच्यावर केलेल्या आरोपवरही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं.
"आरोप हा केवळ आरोपापुरता आहे. संजय राऊत यांच्यामुळेच हे सरकार बसलंय. सरकार बसवण्यात सर्वात मोठी भूमिका त्यांचीच आहे. शरद पवार यांना वळवणं, पक्षाला त्यांच्या दावणीला बांधणं संजय राऊत यांनी केलंय. त्यांनी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांना सांगितलं तर लगेच अंमलबाजवणी होते. मोहित कंबोज यांच्याविरोधात आरोप करण्याऐवजी तक्रार करा, कारवाई करा. पण यांना त्यात जायचं नाहीये केवळ ढोल पिटायचे आहेत," असंही ते म्हणाले.
काय केला होता कंबोज यांच्यावर आरोप?
मोहित कंबोज हे फडणवीस यांचे एक फ्रंटमॅन आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी करताना या कंबोज यांनी पीएमसी बँकेतील घोटाळ्याचे पैसे जमिनी खरेदी. प्रकल्प उभारण्यासाठी वापरल्याचे म्हटले आहे. तसेच हा कंबोज हे एकदिवस देवेंद्र फडणवीसांना बुडविणार असल्याचा गौप्यस्फोटही केला आहे.
मोहित कंबोज यांनी १२ हजार कोटींची जमीन केवळ १०० कोटींना विकत घेतली आहे. त्या जमिनीवर त्यांचा प्रकल्प सुरु आहे. यात पीएनबीचे पैसे गुंतलेले आहेत. ही जमिन एवढ्या कमी पैशांना कशी मिळाली, याचा इतिहास मी तुम्हाला देणार आहे. किती कंपन्या स्थापन केल्या. त्याची माहिती देणार आहे. हे कसे झाले हे देवेंद्र फडणवीसांना चांगले माहिती आहे. त्यांनीच याचे उत्तर द्यावे," असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.