मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेला आदिपुरुष सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. आदिपुरुष सिनेमातील डायलॉग आणि काही दृश्यामुळे अनेक संघटनांनी विरोध केला आहे. नेपाळमध्ये या सिनेमाला बॅन करण्यात आले आहे. तर भारतातही अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या सिनेमाला विरोध करत प्रदर्शन बंद पाडले आहे. त्यात भाजपा नेते राज पुरोहित यांनी या सिनेमावर सडकून टीका करत दिग्दर्शकाला अटक करण्याची मागणी केली आहे.
भाजपा नेते राज पुरोहित म्हणाले की, आदिपुरुष सिनेमाबाबत खूप अपेक्षा होत्या, परंतु जे काही ऐकायला मिळतेय, डायलॉग वैगेरे त्याने खूप दु:ख झाले. दिग्दर्शक आणि निर्मात्यांची प्रभू राम, हनुमान यांचा अपमान करण्याची हिंमत कशी झाली? सेन्सॉर बोर्डाने परवानगी कशी दिली? हे सर्व गुन्हेगार आहेत. भारतीय संस्कृतीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जातो. भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल व्हायला हवा. हत्या केली आणि आता माफी मागतायेत. तुम्ही हिंदू भावनांचा खून केला अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
त्याचसोबत हनुमानाच्या तोंडी अशी भाषा कशी दिली? गाढवाला रावण बनवले. मुस्लीम आहे म्हणून बोलत नाही. त्याचा रामाशी संबंध काय? भारतीय संस्कृती माहिती आहे का? सैफ अली खान प्रमोशनसाठी हिंदू मंदिरात गेलाच नाही. त्याची भावनाच सिनेमात नाही. भूमिका माहिती नाही. त्याला रावणाची भूमिका दिली. आज रावण जिवंत असता तर त्याची भूमिका पाहून स्वत: नाभीत सुरा भोसकून आत्महत्या केली असती असा घणाघात राज पुरोहित यांनी केला आहे.
दरम्यान, भावना दुखावल्याबद्दल दिग्दर्शकाला अटक व्हायला हवी. प्रभू राम, हनुमानाची प्रतिमा खराब केली आहे. १४० कोटी जनतेची भावना दुखावली आहे. ज्या लोकांनी या सिनेमाला परवानगी दिली आहे तेदेखील दोषी आहेत. झोपेत सिनेमाला परवानगी दिली का? या लोकांनाही हटवायला हवे. आम्ही सिनेमाचे तिकीट फाडून टाकले. या सिनेमावर बंदी आणली पाहिजे अशी मागणी भाजपा नेते राज पुरोहित यांनी करत वेळ पडली तर मी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देणार असेही त्यांनी सांगितले.