उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही, जनतेचं काय ऐकणार; भाजप आमदाराचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 08:39 AM2022-11-13T08:39:39+5:302022-11-13T08:39:46+5:30
गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.
काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. अनेक आमदारांनी, खासदारांनीही एकनाथ शिंदे यांची साथ दिली आणि भाजपसोबत त्यांनी राज्यात सरकार स्थापन केलं. दरम्यान, यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहे. आता भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही, तर ते जनतेचं काय ऐकणार असं म्हणत त्यांनी टीकेचा बाण सोडला.
“बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझा पक्ष काँग्रेससोबत जाणार नाही. जायची वेळ आलीच तर पक्ष बंद करून टाकेन. हे उद्धव ठाकरेंनी ऐकलं का? जी व्यक्ती स्वत:च्या स्वर्गीय संस्थापक अध्यक्षांचं ऐकत नाही, स्वत:च्या वडिलांचं ऐकत नाही, ती व्यक्ती मुंबईच्या गोरगरिबांचं काय ऐकणार आहे?,” असं म्हणत राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
“राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेसचा सर्वेसर्वा कोण? तर राहुल गांधींचाच कुणीतरी. आदित्य ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे कंपनीचा सर्वेसर्वा कोण? आदित्य ठाकरेंचं पोरगं. बाकीच्यांनी टीळा लावायचा, हाती झेंडा घ्यायचा आणि उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणायचं बाकी काही नाही,” असं म्हणत त्यांनी टीकेचा बाण सोडला.
गजानन किर्तीकरांनीही सोडली साथ
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी शिदें गटात म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. अगोदरच शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत. मात्र, किर्तीकरांच्या या पक्षप्रवेशात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. कारण, गजानन किर्तीकर यांचा मुलगा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच असणार आहे.