मुंबई: भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर गुरुवारी हल्ला झाल्यानंतर भाजपाकडून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधण्यात येत आहे. कोलकात्यातील डायमंड हार्बरकडे जात असताना त्यांच्या ताफ्यावर अचाक दगड-विटांनी हल्ला करण्यात आल्याने पश्चिम बंगालमध्ये राजकारण चांगलचं तापलं आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाचे नेते राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची सुरक्षा करण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जावी यासाठी आम्ही राज्यपालांच्या भेटीला चाललो आहोत. आमची मागणी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवावी, असं राम कदम यांनी ट्विट करत म्हटलं होतं. यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. यावेळी राम कदम यांच्यासोबत पश्चिम बंगालमधील मुंबईत राहणारे काही नागरिकही उपस्थित होते.
दरम्यान, जे. पी. नड्डा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भाजपा २०० जागा जिंकेल असे विश्वास व्यक्त केला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशीच जे.पी. नड्डांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मोठमोठे दगड, सिमेंटचे ब्रिक्स फेकून गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्याने मोठे तणावाचे वातावरण आहे. ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात डायमंड हार्बरमध्ये जात होते.
भाजपाने आरोप केला की, नड्डा आणि कैलास विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. दक्षिण 24 परगनामध्ये टीएमसी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचा आरोप आहे की, टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजपाचे अध्यक्ष नड्डा यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे दगड फेकले. सुरक्षा दलाने नड्डांच्या कारला सुरक्षित बाहेर काढले.
डीजीपी, मुख्य सचिवांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
पश्चिम बंगालचे राज्यपाल धनखड यांनी सांगितले की, गुरुवारच्या घटनेवर डीजीपी, मुख्य सचिव यांच्याशी चर्चा केली आणि आक्षेप नोंदविला. मी त्यांना अहवाल देण्याचे लिखित आदेश दिले. मात्र, ते कोणतेही इनपूट किंवा रिपोर्ट न घेता आले. राज्याचे पोलीस आता राजकीय पोलीस झाले आहेत का? राज्याची हालत बिघ़डत चालली आहे. केवळ भ्रष्टाचार सुरु झाला आहे. सरकारी तंत्राचे राजकीय आखाडे झाले आहेत आणि विरोधकांना कोणतीही जागा दिलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला.