“देवेंद्र फडणवीस आमचे देवमाणूस, गोरगरिबांचे कल्याण अन् सर्वांना सोबत नेणारे नेते”: राम कदम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 02:31 PM2024-08-27T14:31:14+5:302024-08-27T14:32:05+5:30
Ram Kadam: आम्ही महायुती म्हणून एकत्रच लढू आणि आमचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास राम कदम यांनी व्यक्त केला.
Ram Kadam: मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. मुंबईत ठिकठिकाणी राजकीय नेते, मंडळे दहीहंडीचा मोठा कार्यक्रम दरवर्षी करतात. यंदाही तोच उत्साह पाहायला मिळत आहे. या दहीहंडी कार्यक्रमात सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत असतात. याच दहीहंडी कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना भाजपा नेते आणि आमदार राम कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठे विधान केले.
पत्रकारांशी बोलत असताना, महाविकास आघाडीत जागावाटपावरून हमरी-तुमरीचे वातावरण पाहायला मिळत आहे. महायुतीचे जागावाटप कुठपर्यंत आलेले आहे, असा प्रश्न राम कदम यांना विचारण्यात आला. यावर बोलताना राम कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले.
एकत्रच लढू आणि पुन्हा सरकार स्थापन करू
आमच्या महायुतीत कोणतीही हमरी-तुमरी नाही. आमच्याकडे देवमाणसे आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईभर बॅनर लागलेले आहेत. त्यांची देवमाणूस म्हणून ओळख आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हे सर्व नेते सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहेत. या सगळ्यांचा अजेंडा एकच आहे, तो म्हणजे गोरगरिबांचे कल्याण. महाविकास आघाडीचा अजेंडा हा फक्त वसुलीचा आहे. ज्यांचा अजेंडाच वसुली आहे. त्यांच्यात भांडण होणे स्वाभाविक आहे. आमचा अजेंडा वसुली नाही. आमचा अजेंडा २४ तास गोरगरिबांसाठी काम करणे हाच आहे. त्यामुळे कुठलेही वाद नाहीत. आम्ही महायुती म्हणून एकत्रच लढू आणि पुन्हा सरकार स्थापन करू, असा विश्वास राम कदम यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे दुर्दैवी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच दैवत आहेत. ज्या पद्धतीने विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्या योग्य आहेत का, असा सवाल करत, घडलेल्या घटनेबाबत प्रत्येकाला वाईट वाटत आहे. पण त्याचेही तुम्हाला राजकारण करायचे आहे. महाराजांचा मावळा म्हणून खेद वाटतो, असे राम कदम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.