Mumbai Elections: "कोण नकली अन् कोण असली हे मुंबईकरांना लवकरच कळेल"; भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 09:09 PM2022-08-16T21:09:31+5:302022-08-16T21:10:27+5:30
मुंबईत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
Mumbai Elections: मुंबई महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. आज भाजपाने शिवसेनेला धक्का देत माजी आमदार हेमेंद्र मेहता यांचा पक्षप्रवेश करून घेतला. बोरिवली मतदारसंघातील मेहता यांच्या जनसंपर्काचा भाजपाला येत्या निवडणुकीत फायदाच होईल यात वाद नाही. पण असे असले तरी पालिकेच्या निवडणुका संपेपर्यंत आरोप-प्रत्यारोप आणि टोलेबाजी थांबणार नाही. आजही भाजपा नेते आणि माजी राज्यपाल राम नाईक यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.
"सर्वांशी मैत्री असूनही आपल्या मुद्द्यावर ठाम कसे राहावे याचा आदर्श स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी घालून दिला. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. मुंबई आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे एक नाते होते. त्यामुळे त्यांचा हा पुतळा या निवडणुकांमध्ये प्रेरणा देणाराच ठरेल. पण आज त्यांच्या स्मृती दिनी पुतळ्यासमोर उभे राहून आपण सर्वांनी संकल्प करूया की मुंबईचा महापौर आता भाजपाचाच होईल. त्यामुळे आता असली कोण आणि नकली कोण हे मुंबईकरांना लवकरच कळेल", असा जोरदार टोला राम नाईक यांनी लगावला.
"अटलजींचे मुंबईशी एक अनोखे नाते आहे. दादरच्या शिवाजी मंदिर नाटयगृहात 'वाहतो ही दुर्वांची जुडी' हे मराठी नाटक पाहणारे देशाचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते. तसेच दादरच्या प्लाझामध्ये बसून 'हमाल दे धमाल' हा मराठी सिनेमाही पाहणारे ते एकमेव पंतप्रधान होते. मराठी माणसाचे आवडते पक्वान्न असलेली पुरणपोळी, मोदक सुध्दा अटलबिहारी वाजपेयी यांना आवडत होते. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली, त्यावेळीसुध्दा ते अन्य कुठेही न जाता मुंबईच्या रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे मुंबईवर प्रेम असणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक देशभर अन्य कुठेही होण्यापेक्षा मुंबईत होण्याचे एक आगळे महत्व आहे", अशा भावना आशिष शेलार यांनी व्यक्त केल्या.
भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नातून पश्चिम दुतगती महामार्गानजीक कांदिवली येथे भारतरत्न माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण आज भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. हा पुतळा उभारण्यासाठी आघाडी सरकारच्या काळात परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर राज्यात युतीचे सरकार येताच पुतळा उभारण्याची परवानगी मिळाल्यानंतर आज अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून त्याचे अनावरण करण्यात आले.