Join us  

Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीस हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, त्यागमूर्ती नेता मिळणे राज्याचे भाग्य”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 8:33 PM

Maharashtra Political Crisis: ऐतिहासिक सत्तांतर झाले अन् बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, हे स्वप्न देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केले, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित करत सर्वांनाच धक्का दिला. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळ अचंबित झाले. यानंतर याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत असून, भाजप नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले जात आहे. 

भाजपचे आमदार संजय कुटे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना, महाराष्ट्राच्या इतिहासातील हे ऐतिहासिक सत्तानाट्य होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस या सर्व यशाचे सूत्रधार होते. त्यानंतर जे घडले त्यामुळे भाजपतले काही लोक नाराज झाले असतील, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा त्यागमूर्ती असलेला नेता या महाराष्ट्राराष्ट्राला मिळाला याचे आम्ही भाग्य समजतो, या शब्दांत संजय कुटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

देवेंद्र फडणवीसच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार

सत्तेसाठी आम्ही हे केलेले नाही. ज्या विचारांवर आम्ही जगतो आहे त्याला गेल्या अडीच वर्षात तडा जात होता. यामुळे हिंदुत्वाचे विविध विषय मागे पडत होते. सन २०१९ मध्ये फडणवीसांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपचे सरकार लोकांनी निवडून दिले होते, ते हिंदुत्ववादी सरकार कोणत्याही परिस्थितीत पुनर्स्थापन व्हावे आणि हा विचार पुढे जावा यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मोठा त्याग केला. हा त्याग नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्यही करु शकत नाही. त्यामुळे हे ऐतिहासिक सत्तांतर झाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा. हे त्यांचे स्वप्न देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आहेत, असे संजय कुटे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, जेव्हा सत्तांतराच्या घडामोडी घडत होत्या त्यावेळी त्या कोणालाही माहिती नव्हत्या. जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत हे कळाले तेव्हा ही भावना उफाळून आली की असे कसे झाले. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मोठे आहे, पण एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला तिथे गेलेच पाहिजे, हा आदेश केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांना देण्यात आला. त्यामुळे त्यांच्या इच्छेविरुद्ध देवेंद्र फडणवीसांना हे पद स्विकारावे लागले आणि सत्तेत सामिल व्हावे लागले, असे संजय कुटे यांनी सांगितले.  

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळदेवेंद्र फडणवीसबाळासाहेब ठाकरे