'मातोश्री'चं अर्थसंकल्प बिघडल्यानं राऊतांच्या बुद्धीवर परिणाम; भाजपा नेत्याचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2024 03:02 PM2024-02-22T15:02:57+5:302024-02-22T15:04:04+5:30
मोदींच्या खिशातील पेन २५ लाखांचा, लाखोंचा सूट घालून फिरतात, भाजपा नेत्याच्या हातातील घड्याळ महागडी अशी टीका संजय राऊतांनी केली होती. त्यावर भाजपा नेत्याने प्रत्युत्तर दिले.
मुंबई - मातोश्रीचा अर्थसंकल्प बिघडल्यानं संजय राऊतांच्या बुद्धीवर परिणाम झाला आहे. नको तिथं तोंड चालवून राऊतांनी शिवसेनेचा सत्यानाश केला अशा शब्दात भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडेय यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर केलेल्या टीकेला पांडेय यांनी प्रत्युत्तर दिले.
संजय पांडेय म्हणाले की, बीएमसीच्या चाव्या हातातून गेल्यापासून कंत्राटातली टक्केवारी बंद झाली आहे. मालक आणि नोकराला फारशी कामं उरली नाहीत म्हणून ते इतरांच्या हातातले घड्याळ, गाड्या, पेन पाहत बसलेत. बीएमसीला भ्रष्टाचाराचा अड्डा तुम्ही केलं. तुमच्या काळात लोक बीएमसीला 'बृहन्मुंबई मनी करप्शन' म्हणायचे. कोरोना काळात तुम्ही हजारो कोटींची खिचडी खाल्ली, ऑक्सिजन प्लांटचे पैसे खालले, रिमेडिसिव्हरचे पैसे खाल्ले हे सारं कमी होतं म्हणून मुंबईच्या रस्त्यातून पैसे खाल्ले असा आरोप त्यांनी केला.
तसेच अलिबागमध्ये संपत्ती जमवली. पत्राचाळ प्रकरणात तुरुंगवास भोगून आलेले राऊतांनी भ्रष्टाचारावर बोलणं हस्यास्पद आहे. मुंबई मनपात गोचिडीसारखे घुसून यांनी मुंबईकरांच्या कष्टाचा, घामाचा पैसा लुटला. २-२ मातोश्री बंगले उभारले. बदल्यात मुंबईकरांच्या हातावर वडापाव ठेवण्याचं काम यांनी केलंय.२०१९ ला निवडणूक निकालानंतर तुम्ही बाळासाहेबांना सोडून पवारांच्या मांडीवर बसलेत. बाप कोण आणि पोरगा कोण? यावर बोलायला गेलोत तर तुमची खूप अडचण होईल. राऊत बात निकलेगी तो दूर तक जाएगी, एवढंच ध्यानात ठेवून शांत रहावं असा इशारा भाजपा नेते पांडेय यांनी दिला.
काय म्हणाले होते संजय राऊत?
मोदी करतायेत तसं गरिबीचे ढोंग करा, शंभर टक्के भाजपा नेत्यांच्या हातात महागडी घड्याळे आहेत. ९० टक्के भाजपा नेते परदेशी गाड्यातून फिरतात. नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे तो २५ लाखांचा आहे. मोदी लाखोंचा सूट घालतात. मोदी ज्या विमानातून फिरतात ते खास २० हजार कोटींना घेतलेले आहे. मोदींचे सगळे मित्र हे अब्जाधीश आहे. त्यात चहा विकणारा कुणी नाही. निवडणुकीच्या तोंडावर जी ढोंगबाजी करतायेत ते भाजपाने बंद करावे अशी टीका राऊतांनी केली होती.