Maharashtra Vidhan Sabha: आता एकच पर्याय, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, मी रोज मागणी करणार; सुधीर मुनगंटीवारांचा इशारा
By मुकेश चव्हाण | Published: March 3, 2021 12:41 PM2021-03-03T12:41:44+5:302021-03-03T15:29:17+5:30
3rd Day Of Maharashtra Budget Convention 2021: विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारपासून (१ मार्च) सुरुवात झाली. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे.
मुंबई/जळगाव : जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारपासून (१ मार्च) सुरुवात झाली. आज अधिवेशनाचा (Maharashtra Vidhan Sabha) तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या दिवशी देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. जळगावमधील घटनेवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी करणार असल्याचा ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
सुधीर मुनगंटीवार अधिवेशनात म्हणाले की, आमच्या राज्यातील आई- बहिणींना नग्न करुन नाचायला लावलं जात आहे. यासंबंधिचे सर्व व्हिडिओ देखील असताना तुम्ही आम्ही नोंद घेऊ, असं सांगतात अशी टीका सुधीर मुनगंटीवार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केली आहे. यासोबतच आता राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. यासाठी मी आजपासून स्वत: राष्ट्रपती राजवटीसाठी मागणी करणार आहे. आमच्या आई- बहिणी सुरक्षित नसेल, तर एकच पर्याय आणि तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, असा सुधीर मुनगंटीवार यांनी इशारा दिला आहे.
ज्यांच्यावर राज्यातील महिलांचे / मुलींचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांच्या समोरच आज राज्यातील आई बहिणींच्या इज्जतीचे धिंडोरे निघत आहे .महाविकास आघाडी सरकार चौकशीचे ढोंग आहे . @SMungantiwar@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra#Maharashtra#Jalgaon#जळगांव (2/2) pic.twitter.com/aktMHH5MRR
— MLA Shweta Mahale Patil (@MLAShwetaMahale) March 3, 2021
सुधीर मुनगंटीवार यांच्या या मागणीनंतर या सदर घटनेची चौकशी चालू आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. चौकशी झाल्यानंतर दोन दिवसांत तात्काळ कारवाई करणार असल्याचे आश्वासन अनिल देशमुख यांनी दिले.
दरम्यान, सामाजिक संघटनांनी मंगळवारी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यात संबंधित कृत्याचा व्हिडिओही सादर केला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याची तातडीने दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
महिला व बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार व अन्याय, अत्याचार झालेल्या महिला व मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या. जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे आदींनी मंगळवारी दुपारी वसतिगृह गाठून महिला व मुलींना भेटून माहिती जाणून घेतली असता १ मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी व बाहेरील पुरुष यांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडले.
काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बाहेरील लोकांना व पोलिसांना चौकशीच्या नावाखाली आतमध्ये प्रवेश देऊन अनैतिक कृत्य केले जात असल्याची कैफियत काही मुलींनी मांडली. ज्या मुली चुकीच्या कृत्यांना नकार देतात, त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जाते. सामाजिक कार्यकर्त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता, मुली बाहेरूनच खिडकीतून आपल्यावर बेतलेले प्रसंग ओरडून सांगत होत्या. या मुली बोलण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनाही संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून मज्जाव केला जात होता.