मुंबई - राज्यातील राजकारणात गेल्या काही महिन्यात अनेक उलथापालथ पाहायला मिळाली आहे. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने भाजपाची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी सरकार स्थापन केलं त्यामुळे भाजपाला सर्वाधिक जागा मिळूनही राज्यात विरोधी बाकांवर बसावं लागलं.
राज्यात महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपा एकटी पडली असल्याने नव्या मित्रपक्षाच्या शोधात भाजपा आहे. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जवळ घेण्याची तयारी भाजपा नेत्यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे जवळचे मित्र आशिष शेलार यांनी राज यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. इतकचं नाही तर येणाऱ्या २३ जानेवारीला मुंबईत होणाऱ्या मनसेच्या महाधिवेशनात राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने नव्या राजकारणाला सुरुवात करतील असं सांगितलं जात आहे. याच दरम्यान मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची जवळपास दिड तास एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. यामुळे भाजपा-मनसे भविष्यात एकत्र येणार अशा राजकीय चर्चा होऊ लागल्या आहेत.
या भेटीबाबत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंशी भेट ही राजकीय नाही तर सदिच्छा भेट होती पण भविष्यात काहीही घडू शकतं. राज्यातील बदलेली सत्तासमीकरणं पाहता कालपर्यंत शिवसेना काँग्रेससोबत जाईल का असं कोणी म्हटलं तर वेडं म्हटलं असतं. पण शेवटी ते एकत्र झालेच नाही. त्यामुळे महाराष्ट्र धर्माचा जो मूळ विचार आहे त्यावर चर्चा झाली आहे भविष्यात काहीही होऊ शकतं असे त्यांनी संकेत दिले आहेत.
त्यामुळे शिवसेनेपासून दुरावलेला हिंदुत्ववादी मतदार मनसेच्या माध्यमातून राज ठाकरे जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. येणाऱ्या भविष्यात मनसेला नवी उभारी देण्यासाठी राज ठाकरे २३ जानेवारीला काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत मनसेने अद्याप कोणाच्या बाजूने जाण्याची भूमिका घेतली नाही. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर मनसेची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षासाठी मत मागण्याचं आवाहन मनसेने केले होतं पण राज्यातील राजकीय समीकरण बदलल्याने मनसे महाधिवेशनात काय धोरण ठरविणार हे पाहणं गरजेचे आहे.