हुतात्मा चौकाला हुतात्मा स्मारक संबोधण्यात यावं या मागणीसाठी भाजप आमदार अमीत साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. तसंच नामकरणाचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने पारित केला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली. "ज्या तत्परतेने काळ्या यादीतील कंत्राटदारांना बाहेर काढून परत मुंबईकरांचा पैसा लुटण्यासाठी मोकळ रान दिले. तिच तत्परता हुतात्मा स्मारकाच्या नामकरणासाठी का नाही?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
"संयुक्त महाराष्ट्र चळवळतील वीरांच्या स्मरणार्थ 'हुतात्मा चौक' उभारण्यात आला. आता या घटनेला नुकतीच ६० वर्षे पूर्ण झाली. या ठिकाणाला 'हुतात्मा चौक' न म्हणता त्यास सन्मान देऊन 'हुतात्मा स्मारक' संबोधले पाहिजे म्हणून त्याचे नामकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने २०१७ साली स्वीकारला होता. हा प्रस्ताव सभागृहात मंजूर करून आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठविण्यातही आला. आज घटनेला तब्बल ४ वर्षे ६ महिने पूर्ण झालेत परंतु कोणतीही हालचाल झाली नाही. यावरूनच सत्ताधारी शिवसेनेची मराठी आस्मिता व त्याविषयी प्रेम किती पोकळ आहे, हेच सिद्ध होते," असं साटम यांनी पत्राद्वारे म्हटलं आहे.
"जो मुंबईकर मराठी माणूस संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लढला तोच आज मुंबईतून हद्दपार झाला व आता लोकलचे धक्के खात मुंबईत दररोज ये-जा करतो आहे. या मराठी माणसाच्या आस्मितेचा वापर करत सत्ताधारी शिवसनेने या शहरावर ३० वर्षे अक्षरश: सत्ता भोगली, पण आता सत्ताधारी शिवसेनेला या अस्मितेचा मानबिंदू असणाऱ्या हुतात्मा स्मारकाचाच विसर पडला आहे! यापेक्षा लाजिरवाणी बाब काय असू शकते? म्हणून मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्याकडे जातीने लक्ष घातले पाहिजे," अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली.