मुंबई: पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी पोलिसांनी आज पहाटे त्यांना ताब्यात घेत वडमुखवाडी चरहोली येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पायी वारी साठी परवानगी द्यावी, अशी मागणी बंडातात्या यांनी केली होती. मात्र करुणा महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पायी वारीला परवानगी नाकारली. मात्र पायी वारी करणारच, अशी ठाम भूमिका घेत शनिवारी पहाटे काही वारकऱ्यांनी पायी वारी सुरू केली. त्यावेळी पोलिसांनी त्या वारकऱ्यांसह बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले. पायी वारी करू नये असे समजावून सांगण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला.
बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसले यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मुघलांपेक्षा ठाकरे सरकार अत्याचारी आहे. बंडातात्यांना अटक करायला लाज कशी वाटली नाही. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिणाम भोगायला आता तयार रहावं, असा इशारा देखील तुषार भोसले यांना दिला आहे.
दरम्यान, आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यात काही वारकरी कोरणा पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे वारकऱ्यांनी आळंदी किंवा देहू येथे गर्दी करू नये, तसेच निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले होते. आळंदी आणि देहू येथे निर्बंध लागू केले असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.
सध्या राज्यातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. अशातच कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच अनेक धार्मिक सण उत्सव गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना सावटात पार पडणार आहेत. आषाढी वारीसाठीही सरकारच्या वतीनं नियमावली जारी करण्यात आली असून पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसनं पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे.
राज्यातील मानाच्या १० पालख्यांच्या सोहळ्यास परवानगी
- देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यांस प्रत्येकी १०० व अन्य आठ पालख्यांच्या सोहळ्यास प्रत्येकी ५० वारकऱ्यांना मान्यता
- सहभागी शंभर टक्के वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक
- आषाढी वारीच्या प्रस्थान सोहळ्यानंतर पादुकांसोबत पंढरपूरकडे वारीसाठी विशेष वाहनाद्वारे प्रतिबस २० भाविक याप्रमाणे दोन बसमध्ये एकूण ४० वारकऱ्यांना परवानगी
- श्री संतांच्या पादुका विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पुढे १.५ कि.मी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्यास शासन मान्यता.