Join us

रेणू शर्मावर दबाव टाकल्यानं तिनं धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतली- भाजपा

By मुकेश चव्हाण | Published: January 22, 2021 11:03 AM

रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी करणाऱ्या भाजपाच्या महिला अध्यक्ष उमा खापरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांआधी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. मात्र आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय  मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंयज मुंडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलंव लागेल. 

रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी करणाऱ्या भाजपाच्या महिला अध्यक्ष उमा खापरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका मराठी वृत्तावाहिनीशी बोलताना उमा खापरे या प्रकरणावर म्हणाल्या की, रेणू शर्माबाबत मुळात आमचा प्रश्न नव्हता. आमचा मुद्दा करुणा शर्माबाबत आहे. धनंजय मुंडेंनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या दुसऱ्या विवाहाची माहिती लपविल्याने आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे, असं उमा खापरे यांनी सांगितले. तसेच रेणू शर्मावर दबाव टाकल्याने तिने माघार घेतली, असल्याचा आरोपही उमा खापरे यांनी यावेळी केला आहे. 

तत्पूर्वी, धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे.  गेल्या काही वेळापासून तिची बहिण (करुणा शर्मा) आणि मुंडे यांच्यात सलोख्याचे संबंध नव्हते. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली होती, असं रेणू शर्माने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. 

दरम्यान, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी पुण्यात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, चित्रा वाघ, प्रदेश सचिव अर्चना डेहनकर, प्रदेश सरचिटणीस अश्विनी जिचकार आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. उमा खापरे म्हणाल्या की, सामाजिक न्यायसारखे खाते सांभाळणारे धनंजय मुंडे हे स्वत:हून नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देतील अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली, असं उमा खापरे यांनी सांगितले याआधी सांगितले होते.

खोटे आरोप केल्याप्रकरणी रेणू शर्मांवर कारवाई करावी- चित्रा वाघ

रेणू शर्मांनी धनंजय मुंडेंवर बलात्कारासारखा गंभीर आरोप केला होता. परंतु आता त्यांनी तो मागे घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडेंवर ज्यावेळी बलात्काराचा आरोप झाला हे आमच्यासाठीही तितकंच धक्कादायक होतं. आज ज्या पद्धतीनं तक्रार मागे घेतली गेली हेदेखील तितकंच धक्कादायक आहे," असं चित्रा वाघ म्हणाल्या. पहिल्या दिवसापासून भाजपची भूमिका होती ती स्पष्ट होती. आमच्यासाठी हे प्रकरण धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांच्यापुरतं मर्यादित नव्हतं. आम्ही चुकीचं उदाहरण महाराष्ट्रापुढे जाऊ देणार नाही ही आमची भूमिका होती आणि म्हणून आम्ही त्यांचा राजीनामाही मागितला होता, असंही चित्रा वाघ यांनी सांगितले. 

धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवार म्हणातात...

धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावर म्हणाले की, रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली, त्याविषयी फारशी माहिती नाही. मात्र या संबंधात कागदपत्रं जेव्हा आमच्या हातात आली, तेव्हा खोलात जाण्याची गरज आहे, असा आम्ही निष्कर्ष काढला. त्यामुळे तो बरोबर होता असं म्हणायला लागेल, असं शरद पवारांनी सांगितलं.

टॅग्स :धनंजय मुंडेभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकारशरद पवारपोलिस