Join us  

भाजपात बाहेरून आलेल्यांत अस्वस्थता, नाराजी दूर होणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 6:08 AM

आशिष देशमुख यांच्या राजीनाम्याने सुरुवात!

यदु जोशी

मुंबई : काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपाला रामराम ठोकल्याने भाजपात बाहेरून आलेल्यांमध्ये अस्वस्थता असल्याचा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे. भाजपाच्या १२२ आमदारांपैकी ३५ हून अधिक आमदार असे आहेत की जे काँग्रेस, राष्ट्रवादी वा अन्य पक्षांमधून आलेले आहेत. त्यापैकी एकालाही अद्याप राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. सहा अपक्ष आमदारांचा भाजपाला पाठिंबा आहे पण त्यांच्या पदरीही काही पडलेले नाही. त्यामुळे बाहेरून आलेल्या सात-आठ आमदारांच्या दोन बैठका मध्यंतरी मुंबईतील एका तारांकित हॉटेलमध्ये झाल्या होत्या. चार वर्षांत आपल्याला काहीही मिळालेले नाही; तेव्हा दुसरा विचार करायला काय हरकत आहे, असा सूर निघाला.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. साधारणत: नऊ नवे चेहरे मंत्रिमंडळात येतील. त्यात बाहेरून आलेल्यांपैकी किमान दोघांना तरी संधी दिली पाहिजे, अशी भावना एका ज्येष्ठ आमदाराने नाव न देण्याच्या अटीवर व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आम्ही घेऊन गेलेल्या विकासकामांना प्राधान्याने मंजुरी देतात पण तेवढे पुरेसे नाही. आमच्यापैकी निदान काही जणांना सन्मानाने पदे दिली जातील, या विश्वासाने आम्ही भाजपात आलो पण निराशा झाल्याचे हे आमदार म्हणाले. महागाई, राफेल आदी मुद्द्यांवरून भाजपाविरुद्ध वातावरण तयार होत असतनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून आलेल्या काही भाजपा आमदारांना त्यांचे मूळ पक्ष (विशेषत: काँग्रेस व राष्ट्रवादी) खुणावू लागले असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीला अद्याप एक वर्ष आहे, पण सात महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत बाहेरून आलेल्या आमदारांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री आणि भाजपा नेतृत्व त्यांना गोंजारते की दुर्लक्ष करते हे महत्त्वाचे ठरणार आहे.यांना महामंडळही नाहीडॉ. अनिल बोंडे, डॉ. विजयकुमार गावित, राजेंद्र पाटणी, किसन कथोरे, डॉ. सुनील देशमुख, स्रेहलता कोल्हे, अनिल गोटे, मंदा म्हात्रे, प्रकाश भारसाकळे, अमल महाडिक, मोनिका राजळे, भारती लव्हेकर, प्रशांत ठाकूर, संजय सावकारे हे भाजपात बाहेरून आलेले आज आमदार आहेत. यापैकी देशमुख व ठाकूर वगळता कुणालाही मंत्रीपद वा साधे महामंडळदेखील मिळालेले नाही.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपाआशीष देशमुख