मुंबई: गोव्यामध्ये लवकरच राजकीय भूकंप घडणार असल्याचे विधान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते. गोव्याचे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई हे समर्थक आमदारांसह शिवसेनेच्या संपर्कात असून भाजपाविरोधी सरकार गोव्यात येईल असा दावा त्यांनी केला होता. शिवसेनेच्या या दाव्यानंतर भाजपा सरकार पाडण्यासाठी कोणत्याही आघाडीसाठी आम्ही प्रयत्नशील नसल्याचे म्हणत काँग्रेसनेसंजय राऊत यांचा दावा खोडून काढला होता. त्यातच दिवसा-ढवळ्या स्वप्न पाहणं बंद करा असा टोला भाजपाचे नेते विनय तेंडुलकर यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
संजय राऊत यांच्या विधानानंतर गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, मला गोव्यात भाजपा सरकार कोसळलेलं पाहायला आवडेल. मात्र त्याची शक्यता फार कमी दिसते. ४० सदस्यांपैकी ३० सदस्य भाजपाच्या बाजूने आहेत. त्यामुळे सरकार पाडण्यापेक्षा विरोधात बसण्याची प्राथमिकता असेल. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या स्पष्टीकरणानंतर भाजपाने देखील संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी स्वप्न पाहणं बंद करावं. महाराष्ट्रात जिथे तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केलं आहे. तिथे जनतेला दिलेली आश्वासन तुम्ही पूर्ण करा. दिवसा-ढवळ्या स्वप्न पाहू नका असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी ट्विट करुन सांगितलं होतं की, आम्ही बुद्धिबळात अशी कमाल करतो की, प्यादाही राजाला मात करतो. त्यानंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले की, गोव्याचे विजय सरदेसाई यांच्याकडे ३ आमदार आहेत, भाजपात गेलेले काँग्रेसचे आमदारही संपर्कात आहेत, मगो 1 आमदार संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितले. गोव्यात भाजपाविरोधात शिवसेना आघाडी उघडणार आहे, पर्रिकरांच्या मंत्रिमंडळात राहिलेले विजय सरदेसाई यांच्या समर्थक आमदारांसह शिवसेनेशी आघाडी करणार असल्याचं ते म्हणाले. तसेच भाजपा सरकार धोक्यात येईल फक्त गोव्यातच नव्हे तर देशभरात भाजपाविरोधात आघाडी उघडण्यात येणार असल्याचंही संजय राऊतांनी सांगितले होतं.