हमने बहुत बरदाश्त किया है ना.. तो बरबाद भी हम ही करेंगे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला रोखठोक इशारा दिला. मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद होईल. या पत्रकार परिषदेला संपूर्ण पक्ष उपस्थित असेल. पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी हजर असतील. त्यावेळी आम्ही बोलू आणि संपूर्ण देश ऐकेल, असं राऊत म्हणाले. यानंतर भाजपचे मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
"जो गरजते हैं, वो बरसते नहीं. ज्यांना काही करायचं असतं ते रोज सकाळी ९ वाजता टीव्हीवर येऊन सलीम जावेद यांची स्टोरी पाहून केवळ बोलत नाहीत. तुम्हाला जे काही करायचं ते करा. शासन, प्रशासन दोन्ही तुमच्याकडे आहे. तुम्ही आताच नाही, गेल्या दोन वर्षांपासून दुरुपयोग करत आहात. तुम्ही धमकी कोणाला देत आहात? तीन लोक, साडेतीन लोक की साडेतीनशे लोक, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनं जर तुम्हाला आरसा दाखवला तर तुम्ही पोलीस केस करता. भ्रष्टाचाराबद्दल बोललं की तुम्हाला मिरची लागते. जर तुम्ही काही केलंच नाही, तर मिरची लागण्याचं कारण काय? अशी कोणती मिरची तुम्ही खालली आहात?," असा सवाल मोहित कंबोज यांनी केला.
काय म्हणाले होते राऊत?केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. शिवसेना नेते, ठाकरे कुटुंबावर सातत्यानं चिखलफेक सुरू आहे. आरोप केले जात आहेत. या सगळ्या आरोपांना आम्ही शिवसेना भवनातून उत्तर देऊ. काय होतं ते पाहाच. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. ती मर्यादा त्यांनी ओलांडली आहे. आता पुढे काय होतंय ते बघा, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला इशारा दिला.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांपाठोपाठ महाविकास आघाडीचे मंत्री तुरुंगात जातील. त्यांच्या कोठडीच्या बाजूला त्यांची जागा असेल असं भाजपचे नेते सांगत असतात. पण पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोक त्याच कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील. राज्यात सरकार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि ते सरकार शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा, असा गर्भीत इशाराच राऊत यांनी दिला.