Join us

भाजपच्या दावेदारीने शिवसेनेत अस्वस्थता; मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर दबाव

By यदू जोशी | Published: February 20, 2024 5:51 AM

जागावाटप चर्चा अद्याप नाहीच

यदू जोशी

मुंबई : मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार असलेल्या मतदारसंघांत व गेल्यावेळी शिवसेनेने लढविलेल्या काही मतदारसंघांवर आता भाजपचे नेते दावा सांगू लागल्याने शिवसेनेत अस्वस्थता असल्याचे चित्र आहे.

शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १३  शिंदेंसोबत आहेत. मात्र, त्यांच्या मतदारसंघांमध्ये भाजपने लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे उमेदवार कमळावर लढतील अशी चर्चा होती. मात्र, महायुतीतील घटक पक्ष त्यांच्या चिन्हांवरच लढतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

महायुतीची जागावाटपाची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. ती होईल तेव्हा आपल्या जागा टिकविणे व काही नवीन जागा मिळविणे हे मोठे आव्हान शिंदेंसमोर असेल. महायुतीमध्ये मित्रपक्षांकडील मतदारसंघांमध्येही भाजपने ते मतदारसंघ आपल्याकडेच राहतील, अशी मोर्चेबांधणी केली आहे.

या मतदारसंघांवर भाजपची विशेष नजर

रामटेक, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, पालघर, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई या मतदारसंघांवर भाजपची विशेष नजर असल्याचे बोलले जाते.

नाशिकमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये कमळच पाहिजे, अशी मागणी आपल्या पक्षनेत्यांकडे केली आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरीवर भाजपचाच दावा असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.

आणखी चार-पाच मतदारसंघांमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपचा उमेदवार द्या, असे साकडे प्रदेश भाजपला घातले आहे. या हालचालींच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे खासदार, विविध जिल्ह्यांमधील शिवसेना पदाधिकारी यांनी भाजपचे अतिक्रमण नको, आपणच लढलो पाहिजे, असा दबाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वाढविला आहे.

४-५ विद्यमान खासदार बदलणार...

भाजपने गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणांमधून असे समोर आल्याचे समजते, की शिवसेनेच्या चार-पाच विद्यमान खासदारांबाबत नाराजी असून, उमेदवार बदलला तर शिवसेनेला जिंकण्यासाठी अडचण येणार नाही.

त्यामुळे भाजप काही जागा शिवसेनेकडून घेण्यासाठी व शिवसेनेने गेल्यावेळचे उमेदवार बदलावेत यासाठी

दबाव आणण्याची शक्यता आहे.

त्यात विदर्भातील दोन, मुंबईतील एक, उत्तर महाराष्ट्रातील एक, पश्चिम महाराष्ट्रातील एक आणि मराठवाड्यातील एका मतदारसंघाचा समावेश आहे.

टॅग्स :शिवसेनाभाजपा