दिल्लीत पाठविले जाण्याच्या भीतीने भाजपा नेते धास्तावले; आमदार बनून राज्यातच राहायची इच्छा?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 06:12 AM2024-03-13T06:12:14+5:302024-03-13T06:12:25+5:30

धास्तावलेल्या नेत्यांमध्ये खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही असल्याचे मानले जाते.

bjp leaders panic for fear of being sent to delhi want to become an mla and stay in the state | दिल्लीत पाठविले जाण्याच्या भीतीने भाजपा नेते धास्तावले; आमदार बनून राज्यातच राहायची इच्छा?

दिल्लीत पाठविले जाण्याच्या भीतीने भाजपा नेते धास्तावले; आमदार बनून राज्यातच राहायची इच्छा?

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभेच्या मैदानात उतरवून आपल्याला दिल्लीला पाठविले जाईल काय, या भीतीने सध्या राज्यातील बरेचसे भाजप नेते धास्तावले आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर ‘पक्षाने आपले नाव चंद्रपूरसाठी सुचविले आहे; पण तिकीट कापले जावे यासाठी आपण आग्रही आहोत,’ असे विधान करून धास्तावलेल्यांच्या वतीने जणू प्रातिनिधिक प्रतिक्रियाच दिली आहे.

मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून लढविण्याचे भाजपश्रेष्ठींनी जवळपास निश्चित केले आहे; पण त्यांची लोकसभा लढण्याची इच्छा नाही. मला लोकसभा लढण्याची इच्छा नाही, म्हणून मला उमेदवारी मिळू नये, यासाठी मीच प्रयत्न करीत आहे, असे मुनगंटीवार यांनी माध्यमांना सांगितले. लोकसभेत निवडून गेलो तरी राज्यातील आपले राजकारण संपेल, अशी भीती भाजपच्या नेत्यांना वाटत आहे.

गिरीश महाजनांचा धोका टळणार

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना रावेरमधून लढविणार अशी चर्चा होती; पण जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरणे परस्परपूरक आहेत, त्यात महाजन बसत नसल्याने त्यांच्याबाबतचा धोका टळेल असे दिसते. सोलापूर या अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघात आ. राम सातपुते यांच्या नावाची चर्चा आहे. आ. रणधीर सावरकर यांना अकोल्यातून लढविण्यावर विचार सुरू आहे; पण त्यांच्यासह जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी खा. संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप यांचे नाव सुचविले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जाणारे आ. अभिमन्यू पवार यांना धाराशिवमधून लढविणार अशीही चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा भाजप स्वत:कडे घेणार आणि त्या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड किंवा राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्यापैकी एक जण उमेदवार असेल अशी चर्चाही जोरात आहे.

आमदार बनून राज्यातच राहण्याची इच्छा?

- लोकसभेपेक्षा सहा महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक लढून जिंकावी आणि राज्यातच मंत्री व्हावे, अशी अनेकांची इच्छा आहे; पण भाजपश्रेष्ठींनी आदेशच दिला तर लोकसभा लढण्याशिवाय पर्याय नसेल याची पूर्ण कल्पना या नेत्यांना आहे.

- धास्तावलेल्या नेत्यांमध्ये खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही असल्याचे मानले जाते. ते नागपूर जिल्ह्यातले असले तरी त्यांना वर्धा मतदारसंघातून लढविण्यावर भाजपश्रेष्ठी विचार करीत असल्याची माहिती आहे.

- वर्धेचे खासदार रामदास तडस हे तेली समाजाचे आहेत. बावनकुळे हेही याच समाजाचे आहेत. तडस यांना पर्याय म्हणून बावनकुळे यांच्या नावावर विचार सुरू आहे. त्यांच्याबाबत काय निर्णय होणार, याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांना लागली आहे. 


 

Web Title: bjp leaders panic for fear of being sent to delhi want to become an mla and stay in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.