भाजपा नेत्यांना लाज वाटायला हवी, रुग्णालयातील तोडफोडीच्या घटनेनंतर शिवसेनेचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 08:39 AM2021-05-16T08:39:58+5:302021-05-16T08:42:09+5:30
नाशिक महापालिकेचे बिटको रुग्णालय हे सध्या कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव आहे. या ठिकाणी सुमारे 900 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, रेमडीसीवर इंजेक्शन मिळाले नाही या कारणावरून ताजने यांनी रुग्णालयाचे गेट तोडून त्यांची ईनोवा कार आतमध्ये नेली
नाशिक - देशभरात कोरोनाचं विदारक चित्र पाहायला मिळत आहे. रुग्णांना बेड, इंजेक्शन आणि ऑक्सिजनसाठी वणवण फिरावे लागत आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्याही घटना घडल्या आहेत. आता, रुग्णालयात रेमडेसीवीर इंजेक्शन, मिळत नसल्याने नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड येथील बिटको रूग्णालयात भाजपा नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी तोडफोड केल्याची घटना घडली. त्यानंतर, घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.पोलिसांनी रुग्णालय बंद केले आहे. या घटनेनंतर तीव्र पडसात उमटत असून शिवसेनेनं या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
नाशिक महापालिकेचे बिटको रुग्णालय हे सध्या कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव आहे. या ठिकाणी सुमारे 900 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, रेमडीसीवर इंजेक्शन मिळाले नाही या कारणावरून ताजने यांनी रुग्णालयाचे गेट तोडून त्यांची ईनोवा कार आतमध्ये नेली आणि तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी दाखल झाले असून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. मात्र, या प्रकारानंतर रुग्णालयातील वैद्यकीय स्टाफमध्ये घबराट पसरली असून शिवसेनेनं या घटनेचा निषेंद नोंदवला आहे.
शिवसेना नेते आनंद दुबे यांनी एका पत्रकाराच्या ट्विटला उत्तर देताना, व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, भाजपा नेत्यांना सत्तेचा गर्व चढला असून अशा घटना करताना त्यांना लाज वाटली पाहिजे, असेही त्यांनी म्हटलंय. राजेंद्र ताजने यांनी केलेली तोडफोड आणि शिवीगाळ ही लाजीरवाणी घटना आहे. एकीकडे कोरोनाची लढाई संपूर्ण राज्य लढत आहे. आपले डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस मित्र कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. दुसरीकडे भाजपा नेत्यांचा हा अहंकार दुर्भाग्यपू्र्ण आहे. नाशिक महापालिकेत आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे, त्यामुळेच एवढा अहंकार भाजपा नेत्यांमध्ये आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही आवाहन करतो की, आपल्या नेत्यांना वेसन घाला, असेही आनंद दुबे यांनी म्हटलंय. आनंद दुबे हे शिवसेनेचे प्रवक्ता आहेत.