भाजपाने श्रेय ‘लाटल्याने’ सेनेचा ‘तीळपापड’, स्थायी समितीत धुसफुस
By admin | Published: January 6, 2016 01:40 AM2016-01-06T01:40:24+5:302016-01-06T01:40:24+5:30
नवीन बांधकामांना आवश्यक परवानग्यांमध्ये कपात करून त्याचे श्रेय भाजपाने लाटल्यामुळे शिवसेनेचा तीळपापड झाला आहे़ उभय पक्षांमधील ही धुसफुस स्थायी समितीतही लपून
मुंबई : नवीन बांधकामांना आवश्यक परवानग्यांमध्ये कपात करून त्याचे श्रेय भाजपाने लाटल्यामुळे शिवसेनेचा तीळपापड झाला आहे़ उभय पक्षांमधील ही धुसफुस स्थायी समितीतही लपून राहिली नाही़ २५ पेक्षा कमी वृक्ष कापण्याची परवानगीचे अधिकार आयुक्तांना देण्याच्या प्रस्तावाचे भांडवल करीत शिवसेनेने आगपाखड केली़ मात्र, वृक्ष तोडण्याचा एकही प्रस्ताव आतापर्यंत न अडविणाऱ्या शिवसेनेच्या बेगडी प्रेमावर प्रश्नचिन्ह उभे करत, भाजपाने मित्रपक्षाला गप्प केले
नव्या बांधकामांना परवानगी देण्याची सुधारित नियमावली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित झाली़ या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे नेते पाहुणेच ठरले़ २५ पेक्षा कमी वृक्ष कापण्याच्या परवानगीचे अधिकार आयुक्तांना देण्याचा नियमही यामध्ये आहे़ शिवसेनेला अंधारात ठेवून हा नियम झाल्यामुळे शिलेदार चांगलेच खवळले आहेत़ हे धोरण थेट वृक्ष प्राधिकरण समितीच्या पटलावर आणल्याचा निषेध सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी स्थायी समितीच्या बैठकीत आज व्यक्त केला़
मात्र, या हरकतीच्या मुद्द्याचे विरोधी पक्षाबरोबरच मित्रपक्षानेही समर्थन केले नाही़ मनसेने थेट हल्लाबोल करीत, ही पोटदुखी नेमकी कशासाठी? असा सवाल करीत वर्मावरच बोट ठेवले़, तर वृक्ष तोडण्याचे किती प्रस्ताव आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी फेटाळले, असा सवाल करीत भाजपाने शिवसेनेची कोंडी केली़ विकासासाठी चाकोरीबाहेरचा विचार करावाच लागतो, असे भाजपाच्या नगरसेवकांनी सुनावले़ या वादातच स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी हा मुद्दा राखून ठेवत, आपली सुटका करून घेतली़ (प्रतिनिधी)सेटिंगवरून बिघडली मीटिंग
सत्तेत असूनही आपल्या अधिकारावर गदा येत असल्याची बोंबाबोंब करणाऱ्या शिवसेनेवर मनसेने तोफ डागली़ आम्ही साथ देतो, पण मोठ्या साहेबांचा फोन येताच तुमची प्रशासनाबरोबर सेटलमेंट होते. त्यामुळे शिवसेना सदस्यांना शेपूट घालावी लागते, असा टोला मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी लगावला़, तर सेटलमेंट छोटे पक्ष करतात, आम्हाला सेटलमेंटची गरज नाही, असे प्रत्युत्तर सभागृह नेत्या विश्वासराव यांनी दिले़ यामुळे शिवसेना मनसेत शाब्दिक चकमक उडून, मनसेचे देशपांडे यांनी बैठकीचा अजेंडा फाडत सभात्याग केला़