भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढविण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 12:10 PM2022-05-28T12:10:03+5:302022-05-28T12:10:28+5:30
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना भाजप पुन्हा संधी देईल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला होणारी निवडणूक भाजप लढविणार असल्याची खात्रीलायक माहिती असून, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना भाजप पुन्हा संधी देईल, हे निश्चित मानले जात आहे. दुसऱ्या जागेसाठी माजी मंत्री राम शिंदे आणि डॉ. अनिल बोंडे यांच्या नावाची चर्चा आहे. तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना भाजप संधी देईल, अशी शक्यता आहे. अर्थात पूर्वीचा अनुभव लक्षात घेता, दिल्लीहून अचानक एखादे वेगळे नावही येऊ शकते. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचेही नाव चर्चेत होते. तथापि, आगामी दोन वर्षे पक्ष संघटनेत काम करावयाचे असल्याने राज्यसभेसाठी आपल्या नावाचा विचार करू नये, अशी विनंती तावडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून केली आहे. भाजप राज्यात तिसरी जागा लढवेल, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले. भाजपने अद्याप एकाही उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही.