Join us  

पंकजा मुंडेंना विधान परिषदेत संधी मिळणार? भाजपाकडून चाचपणी सुरू, ११ जणांची नावे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 9:12 PM

Vidhan Parishad Election News: भाजपाकडून विधान परिषद निवडणुकीची तयारी सुरू झाल्याची चर्चा असून, नेमकी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे सांगितले जात आहे.

Vidhan Parishad Election News: लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाचा जोरदार धक्का बसला. महाविकास आघाडीने मोठे कमबॅक करत बाजी मारली. यातच विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधान परिषदेचे ११ सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे, विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधान परिषदेवर आता सर्वच पक्षांकडून कोणाला संधी मिळते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळू शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघांच्या ४ जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. तर, जुलैमध्ये आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून विधान परिषदेच्या ५ जागांसाठी ११ नावांची चर्चा सुरू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांना संधी मिळू शकते, असा मोठा कयास बांधला जात आहे. 

पंकजा मुंडेंना विधान परिषदेत संधी मिळणार?

काही चर्चांनुसार, लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या बीडमधील पराभूत उमेदवार पंकजा मुंडे, जालन्यातील पराभूत उमेदवार रावसाहेब दानवे आणि परभणीतील पराभूत उमेदवार महादेव जानकर यांच्या नावाची विधान परिषदेच्या जागांसाठी चर्चा सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वीच विधान परिषदेत संधी देऊन काही समीकरणे जुळवण्याचे काम भाजपकडून केले जाऊ शकते. गेल्या काही वर्षांपासून राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्नशील असलेल्या पंकजा मुंडेंचा लवकरच विधिमंडळात सदस्य म्हणून समावेश केला जाऊ शकतो. सातत्याने नाराजी दर्शवणाऱ्या पंकजा मुंडे समर्थकांना गुलाल उधण्याची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. 

दरम्यान, विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विधानसभा सदस्य विधान परिषदेतील ११ आमदारांची निवड करणार आहेत. त्यासाठी, २ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. तर, ५ जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. १२ जुलै रोजी रोजी मतदान होणार असून, १२ जुलै रोजीच निकाला जाहीर होणार आहे.  

टॅग्स :पंकजा मुंडेविधान परिषद निवडणूक 2024