आता नाही तर कधीच नाही! उद्धव ठाकरेंचा धक्का; मुंबईत भाजपा नेत्याचा पक्षप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 03:45 PM2023-10-08T15:45:50+5:302023-10-08T15:46:35+5:30
महाराष्ट्रातला तमाम हिंदू, मराठी आणि जे जे लोकशाही प्रेमी आहेत ते एकवटले पाहिजेत. आता नाही तर कधीच नाही असं आवाहन त्यांनी केले.
मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे गटाने भाजपाला धक्का देण्याची खेळी खेळली आहे. भाजपाचे उत्तर मध्य मुंबईचे सचिव सुधीर खातू यांनी कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत उबाठा गटात प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, राजकारणात जो प्रवाह असतो, तो विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात असतो. पण सुधीर खातू यांनी हा प्रवाह उलटा फिरवला आहे. सत्ताधारी पक्षातून तुमचा प्रवास विरोधी पक्षात नव्हे तर देशप्रेमी आणि खऱ्या हिंदुत्ववादी पक्षाकडे झाला आहे. तुम्ही जे बोलला तीच भावना महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रातला तमाम हिंदू, मराठी आणि जे जे लोकशाही प्रेमी आहेत ते एकवटले पाहिजेत. आता नाही तर कधीच नाही असं आवाहन त्यांनी केले.
त्याचसोबत आता हुकुमशाहीची वळवळ गाडली नाही तर आपल्या भगव्याला काही अर्थ राहणार नाही. देशप्रेमाला अर्थ राहणार नाही. मला जे काही बोलायचे आहे ते मी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे. जास्त आता बोलत गेलो तर दसऱ्याला काय बोलणार? बोलायला खूप विषय आहेत त्यावर मी बोलणारच आहे. परंतु आज मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. तुमच्या हातात भगवा आहे. त्यावर मशाल चिन्ह आहे. हा भगवा म्हणजेच मशाल आहे. हीच मशाल, हाच भगवा देशाला दिशा दाखवणार आहे. तसेच आपल्यावरील अत्याचाराला जाळून टाकण्याची ताकदही त्यात आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.