- यदु जोशीमुंबई : लोकसभा निवडणूक प्रचारकाळात मुंबईत भाजपची कोणतीही भूमिका मांडण्याची जबाबदारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना देण्यात आली आहे. मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासह इतर प्रवक्त्यांच्या तोंडाला जवळपास कुलूप लावण्यात आले आहे.तावडे हे भाजप-शिवसेना युतीवर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेल्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी दररोज पत्रपरिषद घेतात किंवा चॅनेलना बाइट देतात. तावडे यांनाच हे काम देण्यामागे काही कारणे सांगितली जातात. भाजप प्रवक्त्यांच्या नावावर नजर टाकली तर ‘विशिष्ट’ चेहरा समोर येतो. निवडणुकीच्या काळात त्यांना बाजूला ठेऊन तावडेंच्या रूपाने बहुजन चेहरा समोर करण्यात आल्याचे म्हटले जाते.तावडे पक्षाची भूमिका मांडण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करतात. त्यामुळे माध्यमांसमोर नेमकी कोणती भूमिका मांडली जाणार आहे, याची पूर्वकल्पना पक्षाच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांना असते. मात्र, या धोरणाचा फटका माधव भंडारी, केशव उपाध्ये, अवधूत वाघ, विश्वास पाठक या प्रवक्त्यांना बसला आहे. उपाध्ये यांच्याकडे प्रदेश कार्यालयातील वॉररूमची जबाबदारी आहे. काँग्रेसने मात्र सचिन सावंत व राष्ट्रवादीने नवाब मलिक या प्रवक्त्यांनाच जबाबदारी दिली आहे.>उद्धव ठाकरे यांची माध्यमांशी कट्टी!शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चॅनेल, वृत्तपत्रांसह कोणत्याही प्रसार माध्यमास मुलाखती न देण्याचा धोरणात्मक निर्णयच घेतला आहे. केवळ शिवसेनेच्या मुखपत्रात त्यांची मुलाखत छापून आली. या व्यतिरिक्त ते अन्य कोणतीही मुलाखत देणार नसल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ चॅनेलला मुलाखती देत आहेत, पण वृत्तपत्रांना त्यांनी अद्याप तरी दूर ठेवले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तेच धोरण अवलंबिले आहे.
हाताची घडी, तोंडावर बोट; भाजपाचे प्रवक्त्यांना आदेश, एकच व्यक्ती बोलणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 4:43 AM