Lata Mangeshkar: “सावरकरांवरील श्रद्धेमुळे लता दीदींना ठाकरे सरकार योग्य सन्मान देत नाहीये का?”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 04:44 PM2022-02-09T16:44:58+5:302022-02-09T16:45:41+5:30
Lata Mangeshkar: लता दीदींना सन्मान देण्यावरून भाजपने महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
मुंबई: भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. लता दीदींच्या निधनाची वार्ता हा संपूर्ण जगासाठी मोठा धक्का होता. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारही करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय शिवाजी पार्क येथे जमला होता. मात्र, यानंतर लता दीदींच्या स्मारकावरून राजकीय वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे किंवा श्रद्धेमुळे महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार लता मंगेशकर यांना योग्य न्याय देण्यास असमर्थ ठरत आहे का, असा रोकडा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे.
देशातील मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश राज्यांसह अनेक ठिकाणी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर बड्या घोषणा स्थानिक सरकार, प्रशासनांनी केल्या. मध्य प्रदेशातील इंदोर येथे लता मंगेशकरांचे स्मारक उभारले जाणार आहे. मात्र, ज्या राज्यात लता मंगेशकरांची संपूर्ण कारकीर्द घडली, त्या महाराष्ट्रात अद्यापही सरकारने ठोस घोषणा केलेली नाही. यावरून भाजप खासदार मनोज कोटक यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
सावरकरांमुळे लता दीदींना ठाकरे सरकार योग्य सन्मान देत नाही का?
वीर सावरकर यांच्यावर लता दीदींची असलेली श्रद्धा सर्वश्रुत आहे. भारतरत्न असलेल्या लता मंगेशकर यांचा योग्य सन्मान करण्यासाठी ठाकरे सरकारला कुणी रोखले आहे, महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कुणाला घाबरत आहे, सावरकरांवर असलेल्या श्रद्धेमुळे लता दीदींचा सन्मान राखण्याबाबत ठाकरे सरकारवर दबाव आहे का, असे एकामागून एक प्रश्न कोटक यांनी उपस्थित केले.
दरम्यान, मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारने लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत अकादमी, महाविद्यालय, संगीत संग्रहालय स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच इंदोर येथे लता मंगेशकरांची प्रतिमाही स्थापन केली जाणार आहे. मध्य प्रदेशप्रमाणे उत्तर प्रदेशमध्येही लता मंगेशकर यांच्या नावाने कला अकादमी सुरू करण्याचा संकल्प योगी सरकारने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात केला आहे.