Join us

...अन् देवीनं माझं ऐकलं, मुलीची इच्छा पूर्ण झाली; iPhone विजेती आई झाली भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 8:25 AM

लोकांना आकर्षित करण्यासाठी या दांडिया महोत्सवात दरदिवशी मराठी वेशभूषा करणाऱ्या २ विजेत्यांना आयफोन ११ बक्षिस म्हणून दिला जातो.

मुंबई - शहरात सध्या सगळीकडे नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गरब्याला राजकीय रंग आला आहे. भाजपाकडून मुंबईत मराठी लोकांना आकर्षित करण्यासाठी पहिल्यांदाच मराठी दांडिया महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. परळ, लालबाग, शिवडी या भागातील मराठी माणसांसाठी शहीद भगतसिंग मैदानात भाजपानं प्रसिद्ध गायक अवधुत गुप्तेसोबत मराठी दांडिया भरवला आहे. 

इतकेच नाही तर लोकांना आकर्षित करण्यासाठी या दांडिया महोत्सवात दरदिवशी मराठी वेशभूषा करणाऱ्या २ विजेत्यांना आयफोन ११ बक्षिस म्हणून दिला जातो. यातील एका विजेती स्पर्धकाने पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या एका सर्वसामान्य स्त्रीची वेशभूषा साकारली होती. रोहिणी पवार असं या विजेत्या महिलेचं नाव आहे. सामान्य घरातील स्त्री डोक्यावर २ हंडे घेऊन पाण्यासाठी निघालेली भूमिका तिने साकारली. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहकडून रोहिणी पवार यांना आयफोन ११ बक्षिस म्हणून देण्यात आला. 

यावेळी मनोगत व्यक्त करताना रोहिणी पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्या म्हणाल्या की, माझ्या मुलीचा ३ दिवसांपूर्वी वाढदिवस होता. ती माझ्याकडे आयफोन मागत होती परंतु माझी तेवढी परिस्थिती नव्हती. मी ही वेशभूषा करून तिला iphone मिळवून देणार आणि देवीनं माझी इच्छा पूर्ण केली. मी रात्रंदिवस देवी आईची पूजा करते. आज मला जे बक्षिस मिळालं ते देवीच्या आशीर्वादामुळे मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी हा उत्सव इथे मोठ्या प्रमाणात आयोजित केला त्याबद्दल रोहिणी पवार यांनी धन्यवाद मानले. 

भाजपाची भन्नाट ऑफरमराठमोळी वेशभूषा करा आणि दररोज जिंका २ आयफोन, याठिकाणी सर्वोकृष्ट वेशभूषेसाठी एक विजेता आणि एक विजेती यांना बक्षिस म्हणून iphone 11 देण्यात येत आहे. ३० सप्टेंबरपासून या उत्सवाला सुरुवात झाली असून ४ ऑक्टोबरपर्यंत याठिकाणी मराठी दांडिया महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. भाजपाच्या या मराठी दांडिया महोत्सवावरून शिवसेना आणि भाजपात शाब्दिक युद्ध रंगल्याचंही दिसून आले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"