शिवसेनेच्या 'टाळी'साठी भाजपाची खेळी, 'मातोश्री'ला प्रसन्न करण्यासाठी देणार 'दिवाळी भेट'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 12:50 PM2018-10-12T12:50:18+5:302018-10-12T12:53:16+5:30

भाजपाच्या कोट्यातील पाच जागा अजून भरायच्या आहेत आणि पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषिमंत्रीपदही रिक्त आहे. तर, एक जागा शिवसेनेच्या हक्काची आहे.

BJP may give 2-3 more seats to shiv sena in cabinet expansion to get their support for lok sabha election 2019 | शिवसेनेच्या 'टाळी'साठी भाजपाची खेळी, 'मातोश्री'ला प्रसन्न करण्यासाठी देणार 'दिवाळी भेट'

शिवसेनेच्या 'टाळी'साठी भाजपाची खेळी, 'मातोश्री'ला प्रसन्न करण्यासाठी देणार 'दिवाळी भेट'

Next

मुंबईः पुढच्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे निव्वळ मंत्र्यांची संख्या वाढवण्याचा भाग नसून भाजपाची राजकीय खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपाच्या काही निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू देऊन ते आपल्या इतर शिलेदारांना जागं करतीलच, पण शिवसेनेला दोन किंवा तीन मंत्रिपदं देऊन लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची 'टाळी' मिळवण्याचा प्रयत्नही भाजपाकडून केला जाणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

भाजपाच्या कोट्यातील पाच जागा अजून भरायच्या आहेत आणि पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषिमंत्रीपदही रिक्त आहे. तर, शिवसेना नेते दीपक सावंत यांनी जून महिन्यात आरोग्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्यानं एक जागा शिवसेनेच्या हक्काची आहे. परंतु, त्यांना अधिकच्या दोन जागा देऊन भाजपा 'मातोश्री'ची नाराजी दूर करेल, असा अंदाज आहे.

नवी 'टीम देवेंद्र' निवडण्याचं काम राज्य पातळीवर वेगानं सुरू आहे. त्यानंतर ही नावं दिल्लीश्वरांकडे पाठवली जातील. पितृपक्ष संपल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु, आता या विस्तारासाठी दसऱ्यानंतरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे कुणाची दिवाळी 'शुभ' होणार आणि कुणाचा 'फटाका फुटणार', याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी कंपनीद्वारे एक सर्वेक्षण करून घेतलं. आपले मंत्री, आमदार, खासदार किती पाण्यात आणि किती खोलात आहेत, याची चाचपणी त्यांनी केलीय. या सर्वेक्षणाच्या आधारेच ते आपली नवी टीम निवडतील. स्वाभाविकच, 'मिशन लोकसभा' आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकींची मोर्चेबांधणी करण्यासाठी जात, प्रदेश, भाषा या गोष्टी विचारात घेऊन मंत्र्यांची निवड केली जाईल, याकडे जाणकारांनी लक्ष वेधलं.

शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिला असला, नरेंद्र-देवेंद्र सरकारवर रोज टीकेचे बाण सोडले जात असले, तरी भाजपाकडून 'लोकसभा-विधानसभा पॅकेज डील' दिलं गेल्यास ते युतीसाठी तयार होऊ शकतात. विरोधक एकत्र मैदानात उतरण्याची चिन्हं असल्यानं भाजपालाही आपल्या या जुन्या मित्राची गरज भासणारच आहे. त्यांना गोंजारण्यासाठी अगदी वरिष्ठ पातळीपासून फोनाफोनी झाल्याचं अलीकडच्या काळात पाहायला मिळालं होतं. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्तानं भाजपा 'मास्टरस्ट्रोक' लगावण्यासाठी सज्ज आहे.

Web Title: BJP may give 2-3 more seats to shiv sena in cabinet expansion to get their support for lok sabha election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.