मुंबई :
मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास भाजपचा महापौर असेल. रिपाइं-शिवसेनेला अडीच अडीच वर्षे उपमहापौरपद दिले जाईल, असा फॉर्म्युला भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी रिपाइंच्या मुंबई मेळाव्यात जाहीर केला. मुंबईतील सोमय्या मैदान येथे रिपाइंच्या महामेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले. यावेळी बोलताना मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी महापालिकेत सत्ता आल्यास रिपाइंला उपमहापौरपद दिले जाईल, असे जाहीर केले. मुंबई महापालिकेची सत्ता ही रिपाइंला त्यांचा वाटा दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू, असे आशिष शेलार म्हणाले.
यावर आपल्या भाषणात बोलताना आठवले यांनी शिवसेना भाजपच्या उमेदवारांना रिपाइं पाठिंबा देईल. त्याचप्रमाणे आमच्या उमेदवारांना शिवसेना भाजपने निवडून आणावे, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे पालिकेत सत्ता आल्यास भाजपचा महापौर तर शिवसेना-रिपाइंचा उपमहापौर अडीच अडीच वर्षे असेल, असे जाहीर करून टाकले. महापालिकेसह सर्व महापालिका निवडणुका रिपब्लिकन पक्ष भाजप आणि शिवसेना यांच्यासोबत महायुती करून लढणार आहोत. मुंबईत रिपब्लिकन पक्षाची भीमशक्ती भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत ताकदीने उभी आहे. मुंबई महापालिकेचा सामना रिपब्लिकन पक्षाच्या साथीने महायुती निश्चित जिंकेल, असेही आठवले म्हणाले.