लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सत्तांतरानंतर सर्वात जास्त लाड शिंदे गटाच्या ४० आमदारांचे पुरवण्यात येत आहेत. हे आमदार जीएडीकडे पत्र घेऊन जाताहेत त्यावर मुख्यमंत्र्यांचे शेरे दिसून येत असून हजारो कोटींची कामे मंजूर केली जात असल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे गटनेते एकनाथ खडसे यांनी मांडताच भाजप आमदार आक्रमक झाले.
आम्हाला १० कोटी देतात आणि शिंदे गटाच्या आमदारांना २० कोटी देतात, असे भाजपचे अनेक आमदार खासगीत सांगतात, असे खडसे म्हणाल्याने गोंधळात आणखी भर पडली. आमदार मंत्र्यांकडे आल्यानंतर त्यावर शेरे लिहिले जातात, हे माजी मंत्री असल्याने खडसेंनाही माहीत आहे. त्यामुळे खडसे यांचे वक्तव्य योग्य नाही, असा आक्षेप मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नोंदवला. अखेर गोंधळ रोखण्यासाठी उपसभापतींना मध्यस्थी करावी लागली.
मला लावलेला न्याय भूषण देसाईंना लावणार का?
नाथाभाऊंचा घोटाळा अर्ध्या एकरचा असल्याचे मत काहीजणांचे आहे. तरीही, माझ्या जावयाला आत टाकले, मुलगी आणि माझ्यामागे चौकशीचा सरोमिरा लावला, मग भूषण देसाईंचा घोटाळा हा ४०० हेक्टरचा आहे. तो आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या आश्रयाखाली आल्याने पावन झाला का, मला लावलेला न्याय भूषण देसाईंना लावणार का, असा सवाल त्यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"