Mumbai Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी यादी जाहीर होण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. भाजपानंतर शिवसेना ठाकरे गटाने मुंबईतील उमेदवार जाहीर केले. मात्र, यावरून मविआमध्ये वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या उमेदवारी यादीबाबत काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, शरद पवार यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाने आघाडी धर्माचे पालन केले नसल्याचे म्हटले आहे. यातच ईशान्य मुंबईत माझाच विजय होणार, असा विश्वास भाजपा उमेदवार मिहिर कोटेचा यांनी व्यक्त केला.
ठाकरे गटाने ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. संजय दिना पाटील हे माजी खासदार आहेत. २००९ मध्ये किरीट सोमय्या यांना पराभूत करुन ते लोकसभेवर गेले होते. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत किरीट सोमय्या यांनी संजय दिना पाटील यांचा पराभव केला होता. संजय दिना पाटील पहिल्यांदा खासदार झाले, तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर ठाकरे गटात आलेल्या संजय दिना पाटील यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला आहे. संजय दिना पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मिहिर कोटेचा यांनी प्रतिक्रिया दिली.
हे तर राष्ट्रकार्याचे धर्मयुद्ध, विजय माझाच होणार
संजय दिना पाटील यांना शुभेच्छा देतो. संजय दिना पाटील हे माझे जुने मित्र आहेत. परंतु, जसे महाभारतात कर्ण हा एक व्यक्ती म्हणून चांगला होता. पण धर्मयुद्धात दुर्योधनाच्या बाजूने होता. यामुळेच तो पराभूत झाला. हेच यावेळी ईशान्य मुंबईत होणार आहे. हेही एक राष्ट्रकार्याचे धर्मयुद्ध आहे. मी हे आव्हान स्वीकारतो. विजय माझाच होईल, असा विश्वास मिहिर कोटेचा यांनी व्यक्त केला.
दरम्यान, काँग्रेस आणि त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता शरद पवारांच्या पक्षानेही त्यांची यादी जाहीर करण्याची तयारी केली आहे. महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद घेत उमेदवारांची घोषणा करण्यात येणार होती. परंतु आता आघाडीतले घटक पक्ष वेगवेगळ्या उमेदवार याद्या घोषित करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच ५ उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत.