भाजपचे मंत्री ‘दक्ष’; संघाने बोलविली बैठक, मंत्र्यांना देणार अजेंडा, दोन दिवस घेणार शिकवणी
By यदू जोशी | Published: February 1, 2023 10:19 AM2023-02-01T10:19:17+5:302023-02-01T10:20:00+5:30
BJP : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राज्यातील मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची रा. स्व. संघाकडून दोन दिवस मुंबईत शिकवणी घेतली जाणार आहे.
- यदु जोशी
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राज्यातील मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची रा. स्व. संघाकडून दोन दिवस मुंबईत शिकवणी घेतली जाणार आहे. मंत्र्यांच्या हाती संघाचा अजेंडा दिला जाईल, असे म्हटले जाते. आपापल्या खात्याने गेल्या सहा महिन्यांत काय चांगले काम केले याची तयारी मंत्र्यांनीही केली आहे.
संघ आणि भाजपचे मंत्री यांच्यातील समन्वयासाठी ही बैठक मुख्यत्वे होत आहे. संघाच्या यशवंत भवन या कार्यालयात दि. १ व २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या बैठकीत संघाचे काही ज्येष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. राज्य सरकारकडून संघाला नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत हे सांगितले जाईल, तसेच कोणत्या गोष्टींपासून दूर राहणे अपेक्षित आहे याबाबत कानपिचक्याही दिल्या जातील असे म्हटले जाते. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अशी बैठक पहिल्यांदाच होत आहे.
हे विषय अजेंड्यावर
सहकाराबाबतच्या अपेक्षा, आदिवासी विकासाच्या तसेच ग्रामविकासाच्या दृष्टीने कोणत्या योजना राबविल्या पाहिजेत, महिला बालकल्याण संदर्भात कोणत्या बाबींवर फोकस असावा, धार्मिक पर्यटनाला चालना, वैद्यकीय सेवा सुविधा पुरविताना कोणत्या घटकांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, अनुसूचित जाती-जमातींसाठी सरकारकडून कोणत्या अपेक्षा आहेत, नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना विशेषत्वाने कोणते मुद्दे समोर असले पाहिजेत, आदी विषयांवर मंत्र्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती आहे.
कोअर कमिटी बैठक उद्या
भाजपच्या राज्य कोअर कमिटीची बैठक २ फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे. पक्षाचे दोन दिवसांचे अधिवेशन नाशिक येथे १० आणि ११ फेब्रुवारीला होणार आहे. या बैठकीचा अजेंडा कोअर कमिटीमध्ये ठरविला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
५५ कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे आव्हान
nलोकसभेच्या २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवलेल्या भाजपने आता पक्षाच्या पन्ना प्रमुखांपर्यंतच्या हजारो पदाधिकाऱ्यांसाठी ५५ कलमी कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे. येत्या दोन दिवसांत त्यासाठीचा अजेंडा पदाधिकाऱ्यांच्या हाती दिला जाईल. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे लाभ हा मुख्य फोकस असेल.
nप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या आधीच पदाधिकाऱ्यांवर खूप जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. त्या पूर्ण केल्या की नाही, कोणत्या टप्प्यावर आहेत याचा अहवाल मंडळ, जिल्हा, विभाग व प्रदेश कार्यालयाकडे पाठविणे अनिवार्य केले आहे. नमो ॲप, माय गव्हर्न्मेंट ॲप, व्होटर हेल्प ॲप डाऊनलोड करणे सक्तीचे केले आहे.