मुंबई: राज्यात आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी आज करण्यात येत आहे. त्यातच भाजपाचे शिर्डी विधानसभेचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा दाखल करण्यात आलेला उमेदवारी अर्ज धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिर्डी विधानसभेच्या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (4 ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच त्यांनी अर्जामध्ये स्वतःसह अन्य प्रतिनिधींचे 3 असे एकुण 4 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र राधाकृष्ण विखेंनी ज्या वकिलाकडून प्रतिज्ञापत्र तयार केले. त्या वकिलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा विरोधकांनी केल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावरच काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. ज्या वकिलांकडे हे प्रमाणपत्र बनवण्यात आलं, त्यांचा नोटरी करण्याचा परवाना 2016 मध्येच संपला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. याबाबत शिर्डी विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यास भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.