शेवटी 'जित्या'ची खोड..; भाजप मंत्र्यांची आव्हाडांवर जबरी टीका, आमदाराचाही पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 02:54 PM2023-02-04T14:54:24+5:302023-02-04T15:04:09+5:30
या मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई - “अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! तुम्ही मुलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणाही साधला. त्यामुळे, भाजपा नेतेही आता आव्हाड यांच्यावर पलटवार करत आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्री भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाडांवर जबरी टिका केली. त्यानंतर, आव्हाड यांनीही मंत्री महोदयांवर पलटवार केला आहे. या मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं.
जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वी औरंगजेब हा क्रूर नव्हता, असे विधान केले होते. त्यानंतर, आता पुन्हा एकदा अफजल खान आहेत, म्हणून शिवाजी महाराज आहेत, असे म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांना मुघलप्रेमी म्हणत त्यांच्यावर जबरी टीका केली.
जाहीर निषेध! मुघलप्रेमी असणाऱ्या बोलघेवड्या जितुजींनी पुन्हा एकदा मुघलांवर स्तुतीसुमने उधळत छत्रपती शिवाजी राजांबद्दल चुकीचे उद्गार काढलेत. छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून तुम्ही आम्ही आहोत, हे विसरू नको. शेवटी'जित्या'ची खोड... तेच खरं, अशा शब्दात मंत्री चव्हाण यांनी आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. त्यास, आव्हाड यांनीही पलटवार केला आहे.
'हे सगळे समजायला अक्कल लागते .. औरंगजेब अफजल खान हे इतिहासातून काढून टाकले तर मग शिवाजी महाराजांची लढाई कुणाबरोबर झाली. त्यांचे शौर्य चलाखी युद्ध नीति कशी समजावणार .. जाऊदे तुमचा दोष नाही. हे सगळे समजणे म्हणजे मुंबईचा गँगवॉर नाही .. झाकली मूठ सव्वालाखाची..,' असे म्हणत आव्हाड यांनी रविंद्र चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलंय. तसेच, झाकली मूठ सव्वालाखाची म्हणत इशाराही दिला.
हे सगळे समजायला अक्कल लागते .. औरंगजेब अफजल खान हे इतिहासातून काढून टाकले तर मग शिवाजी महाराजांची लढाई कुणाबरोबर झाली. त्यांचे शौर्य चलाखी युद्ध नीति कशी समजावणार .. जाऊदे तुमचा दोष नाही. हे सगळे समजणे म्हणजे मुंबईचा गँगवॉर नाही .. झाकली मूठ सव्वालाखाची.. https://t.co/8kUhLwftqz
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 4, 2023
दरम्यान, पुण्यातील याच कार्यक्रमात भाजपवर निशाण साधताना येथील मुस्लीम सजाज देशप्रेमी असल्याचा दाखलाही आव्हाड यांनी दिला. “तुम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मुस्लिम वस्त्यांमध्ये जाऊन बघा, किती उत्साहाचे वातावरण असते. मुसलमान वस्तीत उत्साह असतो. त्यांच्या मनात भीती असते अस्तित्वाची. त्यांना सिद्ध करावं लागतं की ते भारतीय आहेत किती वर्ष त्यांच्याकडे पुरावा मागणार?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.