"सरकारने एक इंचही जागा अदानीला दिलेली नाही"; आशिष शेलारांचे महाविकास आघाडीला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 06:38 PM2024-10-21T18:38:57+5:302024-10-21T18:40:54+5:30

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे.

BJP MLA Ashish Shelar criticized leaders of Mahavikas Aghadi over the Dharavi redevelopment project | "सरकारने एक इंचही जागा अदानीला दिलेली नाही"; आशिष शेलारांचे महाविकास आघाडीला प्रत्युत्तर

"सरकारने एक इंचही जागा अदानीला दिलेली नाही"; आशिष शेलारांचे महाविकास आघाडीला प्रत्युत्तर

Ashish Shelar on Dharavi Project : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार वाद सुरु झालाय. गेल्या २० वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प अद्याप सुरुही झालेला नाही. आता अदानी समूह महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने धारावीचा पुनर्विकास प्रकल्प राबवणार आहे. या निर्णयाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार विरोध केला आहे. प्रकल्पाच्या नावावर मुंबईतील मोक्याच्या जागा अदानी समूहाला दिल्या जात असल्याचा आरोप खासदार वर्षा गायकवाड आणि आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंच्या या आरोपांवर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी जोरदार पलटवार केला आहे. धारावीकरांना हक्काचे घर महायुतीचे सरकार देणार असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. महाविकास आघाडीचे नेत्यांनी महायुती सरकारवर मुंबईच्या मोक्याच्या जागा अदानींना दिल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे महाविकाचे आघाडीचे नेते धारावीकरांची फसवणूक करत असल्याचा आरोप महायुतीने केला आहे. आशिष शेलार यांनीही ट्वीट करत निवडणुकीत धारावीकरांची माथी भडकवली जातील असं म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केलं आहे. 

"धारावीकर हो सावधान! निवडणूक जाहीर झालेय,आता धारावीत अफवा पसरवल्या जातील. माथी भडकवली जातील. गल्ली गल्लीत शहरी नक्षलवादी आणि त्यांचे राजकीय फंटर फिरतील. तुम्ही सावध रहा! अफवांवर विश्वास ठेवू नका! लक्षात ठेवा. सरकारने एक इंचही जागा अदानीला दिलेली नाही. धारावीतील प्रत्येकाला मुंबईतच घर मिळणार, मैदान, बगीचा, सेवा सुविधांसह ट्रान्सपोर्ट हब उभे राहणार, धारावीच्या माथी असलेला शिक्का पुसला जाणार. पण उबाठा सेना पुनर्विकासाला विरोध करीत आहे. कारण "पेग, पेग्विन आणि पार्टी गँगचा" धारावीतील नेचर पार्कचा ३७ एकरचा भूखंड हडप करायचा डाव आहे.  त्यासाठीच तुमची माथी भडकवली जात आहेत. सावधान! पुन्हा महायुतीचे सरकार येणार धारावीकरांना हक्काचे घर आम्हीच देणार!", असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

याआधी आशिष शेलार यांनी शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना धारावी पुनर्विकास प्रकल्पावरील चर्चेसाठी खुले आव्हान दिले होते. आदित्य ठाकरे शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते झाले आहेत. हा प्रकल्प महत्त्वाचा आणि प्राधान्याचा प्रकल्प आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड खोटे बोलत आहेत, असं आशिष शेलार म्हटलं होतं.
 

Web Title: BJP MLA Ashish Shelar criticized leaders of Mahavikas Aghadi over the Dharavi redevelopment project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.