मुंबई - गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड/रत्नागिरी आणि पनवेल-सावंतवाडी रोड/रत्नागिरीदरम्यान ७२ विशेष गाड्या चालवणार आहे. यातून फक्त आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. मात्र रेल्वेनं चाकरमान्यांसाठी सोडलेल्या ७२ विशेष रेल्वे गाड्या फुल्ल झाल्या आहेत. याच दरम्यान कोकणात जाण्यासाठी अधिकच्या गाड्या सोडण्याची मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.
गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणातील आपल्या गावी जातात. यावर्षी कोकण रेल्वेने ७२ अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आणि बुकिंग सुरू होताच काही दिवसांतच बुकिंग फुल्ल झाले. मात्र, बरेच चाकरमानी अद्यापही प्रतीक्षा यादीतच आहेत. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. "गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेने सोडलेल्या उत्सव विशेष गाड्या फुल झाल्याने अजून अधिकच्या गाड्या सोडण्यात याव्यात, अशी विनंती रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची पुणे दौऱ्यात भेट घेऊन केली. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष मुळीक, योगेश टिळेकर सोबत होते" असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात ७२ विशेष रेल्वे गाड्या
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड विशेष दररोज (३६ फेऱ्या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ५ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत रात्री १२.२० वाजता सुटून सावंतवाडी रोडला त्याचदिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. सावंतवाडी रोड येथून विशेष गाडी दररोज ५ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत दुपारी २.४० वाजता सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसऱ्यादिवशी पहाटे ४.३५ वाजता पोहोचेल. या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, नांदगाव, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ६ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यंत दरसोमवारी व शुक्रवारी दुपारी १.१० वाजता सुटेल आणि त्याचदिवशी रात्री १०.३५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल. द्वि-साप्ताहिक विशेष गाडी रत्नागिरी येथून ९ सप्टेंबरपासून २३ सप्टेंबरपर्यंत दर रविवारी आणि गुरुवारी रात्री ११.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसऱ्यादिवशी सकाळी ८.२० वाजता पोहोचेल. या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली आणि संगमेश्वर येथे थांबणार आहेत.