मनसेला आता भाजपाचाही पाठिंबा; शिवसेनेवर निशाणा साधत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
By मुकेश चव्हाण | Published: February 4, 2021 04:17 PM2021-02-04T16:17:24+5:302021-02-04T16:18:39+5:30
मनसेने केलेल्या आरोपानंतर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनाही शिवसेनेवर टीका केली आहे.
मुंबई: शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या दाखवत खंडणीखोरीच्या आरोपाचे पुरावे सादर करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. मुंबईत त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. "विरप्पन गँगचा एन्काऊंटर करणार हे माझं ट्विट अनेक शिवसेना नेत्यांना झोंबलं होतं. विरप्पन गँग कशी खंडणी वसुली करते याचे मी आज पुरावे घेऊन आलोय", असं सांगत संदीप देशपांडे यांनी भर पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या सादर करण्यात आल्या.
शिवसेनेने हॉकर्स झोनची घोषणा याआधीच केली होती. पण तसं काही झालंच नाही. आता शिवसेनेकडूनच फेरीवाल्यांना रितसर पावती देऊन खंडणी वसूल केली जात आहे. या पावतीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. याशिवाय सार्वजनिक पथाचा वापर करणाऱ्यांना होणार उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मुलनासाठी घेण्यात येणार आकार असं लिहीण्यात आलं आहे", असं संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
मनसेने केलेल्या आरोपानंतर भाजपानेही शिवसेनेवर टीका केली आहे. राम मंदीराच्या वर्गणीला विरोध करायचा आणि सार्वजनिक पद पथावरच्या लोकांकडून हप्ता वसुल करायचा, अशी टीका भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. हप्ता वसुलीसाठी मुख्यमंत्र्यांचा फोटो कोणी वापरत असेल तर त्याला मुख्यमंत्र्यांचे समर्थन नसेलच. मात्र अशा प्रकारे फोटो वापरणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.
हप्ता वसुलीसाठी मा. मुख्यमंत्र्यांचा फोटो कोणी वापरत असेल तर त्याला मा. मुख्यमंत्र्यांचे समर्थन नसेलच.. त्यामुळे अशा प्रकारे फोटो वापरणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा! @BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@ChDadaPatilpic.twitter.com/AZQ3jq81H1
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 4, 2021
संदीप देशपांडे यांचे डोळे पाणावले
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेल्या पावतीच्या माध्यमातून खंडणी गोळा केली जात असल्याचं सांगताना संदीप देशपांडे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. "बाळासाहेबांचा, मुख्यमंत्र्यांचा, पर्यावरण मंत्र्यांचा फोटो पावतीवर लावून खंडणी वसूल केली जातेय. मला सगळ्यात जास्त दु:ख याचं वाटतंय की या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो आहे", असं म्हणत असताना संदीप देशपांडे यांचे डोळे पाणावले. तसेच पोलिसांनी या खंडणीखोरांना वेळीच चाप लावणे गरजेचे असून अशा खंडणीखोरांच्या हातातून मुंबई वाचवणे गरजेचे असल्याचंही ते पुढे म्हणाले. मुंबई पोलिसांत याबाबत सविस्तर तक्रार देणार असल्याचंही संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
मनसे संघटना आहे की पक्ष तेच कळत नाही- आदित्य ठाकरे
मनसेकडून शिवसेनेचा विरप्पन गँग असा उल्लेख करण्यात आला होता. त्याबाबत विचारलं असता मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. "ती संघटना आहे की पक्ष तेच मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाइमपास टोळी आहे", असं आदित्य ठाकरे म्हणाले.