Join us  

'राम वर्गणीची चेष्टा केली, उद्धव ठाकरेंचा राम मंदिराशी संबंधच काय?'; आशिष शेलार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 6:59 PM

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई: राम वर्गणीची चेष्टा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने केली. राम वर्गणीच्या विषयावर कुचेष्टा करणारे लेख त्यांच्या वर्तमानपत्राने लिहिले. राम मंदिर बांधायला सुरुवात होताना जागेसंबंधी ज्यांनी वादविवाद केले अशा व्यक्तीची तळी उचलणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा राम मंदिराशी संबंधच काय?, असा सवाल भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

आशिष शेलार म्हणाले की, राम मंदिर कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही आणि ती असू शकत नाही. ती समस्त हिंदू समाजाची आहे. साधुसंत महंत तसेच ज्या सामान्य माणसांनी राम मंदिरासाठी एक-एक रुपया स्वतःच्या खिशातून दिला त्या सर्वांचे राम मंदिर आहे. खऱ्या ग्राम भक्तांची आहे. ही प्रॉपर्टी नक्की उद्धव ठाकरे यांच्या गटाची नाही. भगवान राम हा काल्पनिक आहे असे म्हणणारे कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे यांचे वकील आहेत. रामसेतू असं काही प्रकार नाही, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्या काँग्रेसशी उद्धव ठाकरे यांची हातमिळवणी आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. 

हा श्रद्धेचा उत्सव.....

राम मंदिराचा राजकीय इव्हेंट होऊच नये आणि कुणी तसे करतही नाही. हा श्रद्धेचा उत्सव आहे. इतके वर्षे भारतीय मनामध्ये जे साठले आहे त्याचा उत्सव आहे. या आनंद उत्सवामध्ये सर्वांना सहभागी झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. ज्यांचा या उत्सवामध्ये तिळमात्र संबंध नाही त्यात निमंत्रित नसलेल्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे बोलणे हा थयथयाट आहे. राजकीय भूमिकेतून त्याला विरोध करण्यासाठी उद्धवजी तुम्ही का पुढे आहात? असाही सवाल त्यांनी केला. त्यातून कुठली मते तुम्हाला मिळवायची आहेत?, त्याची चादर कुठल्या रंगाची आहे? हे तुम्ही स्पष्ट करा, असेही आशिष शेलार म्हणाले. संजय राऊतांना काँग्रेसचे लोक सहन करतील असे वाटत नाही-

महायुतीच्या जागा वाटपासंबंधी निर्णय तिन्ही पक्षाची नेते घेतील. ज्या पद्धतीचा कलगीतुरा ठेवणीतले शब्द दाखवण्याचे काम ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत करत आहेत. त्यावरून हे स्पष्ट होते की, संजय राऊत यांना काँग्रेसचे लोक सहन करतील असे वाटत नाही परंतु तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आमच्याकडे चर्चा, विमर्श चालू आहे. तिन्ही नेते आपली भूमिका स्पष्ट करतील. लोकसभा निवडणुकीच्या कामाला आम्ही लागलो आहोत. भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्र प्रदेशची अतिशय महत्त्वाची बैठक झाली. ज्यामध्ये सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, लोकसभा संयोजक सहभागी झाले. महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकण्याच्या दृष्टीने विचारविनिमय झाला. भाजपा केंद्रस्तरावरून आलेल्या निर्देशानुसार प्रत्यक्ष तयारी आणि आयोजनबाबत चर्चा झाली, अशी माहिती देखील आशिष शेलार यांनी दिली.

टॅग्स :उद्धव ठाकरेआशीष शेलारभाजपाअयोध्याराम मंदिर