"भाजपा हा हिंदू सण सुरु ठेवणारा पक्ष, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेप्रमाणे सण बंद पाडणारा नाही"; आशिष शेलारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 04:25 PM2022-09-04T16:25:46+5:302022-09-04T16:26:56+5:30
"माजी मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेने १०० वर्षांची लालबागच्या राजाची परंपरा खंडित केली होती"
BJP vs Mahavikas Aghadi: "भाजपा हा पक्ष हिंदू सण सुरू ठेवणारा, जोपसणारा, वाढवणारा पक्ष आहे. तो आमचा आत्मा आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेप्रमाणे आम्ही हिंदू सण बंद करणारे नाही", अशी अतिशय बोचरी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर केली. मुंबई भाजपातर्फे मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये १०२६ मंडळे सहभागी झाली आहेत. या मंडळाचे परिक्षण करण्यासाठी तज्ज्ञांची ३० पथके तयार करण्यात आली आहेत. आज मुंबई भाजपा कार्यालयाजवळून या पथकांच्या गाडयांना आमदार आशिष शेलार यांनी झेंडा दाखवून रवाना केले. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर तोफ डागली.
"हिंदू सण हा भाजपाचा आत्मा असून आम्ही कोरोना काळातही सण अखंडित ठेवण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचे संकट टळल्यानंतर दहिहंडी उत्सव भाजपाने जोरदार साजरा केला, आता गणेशोत्सवात ही भाजपा हिरहिरीने सहभागी झालो आहोत. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा जाहीर करताच त्याला मंडळाचां प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मुंबईतील १०२६ मंडळे सहभागी झाली आहेत. त्यांचे परिक्षण ३० पथके करणार असून प्रत्येक पथकात कॅमेऱ्यासह ३ जण असून एकूण ९० जणांचा समावेश असलेली ही पथके या सगळयांचे परिक्षण करणार आहेत. कोराना काळात दुदैवाने माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने १०० वर्षांची लालबागच्या राजाची परंपरा खंडित केली. अशा प्रकारे हिंदू सणांना विरोध करणारे आम्ही नाही. भाजपा सणांची परंपरा जोपासणारा पक्ष आहे", असा सणसणीत टोला आशिष शेलार यांनी लगावला.
मुंबई भाजपाचा गणेशदर्शन दौरा सुरू
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी गणेशोत्सवानिमित्त मुंबईच्या सहा जिल्हयांचा दौरा सुरू केला असून रोज रात्री ९ ते १ वाजेपर्यंत ते मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना भेट देत आहेत. गेले दोन दिवसांत त्यांनी उत्तर मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या जिल्हयात दौरा करुन ३० मंडळांना भेटी दिल्या. या दौऱ्यात स्थानिक आमदार आणि भाजपा पदाधिकारीही मोठया संख्येने सहभागी होत असून ढोल ताशांचा गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत गणपती बाप्पाचा जयजयकार करत हे दौरे सुरू आहेत. या दौऱ्यांमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते. मंगळवारी दक्षिण मुंबई तर बुधवारी दक्षिण मध्य मुंबई, गुरूवारी उत्तर पूर्व जिल्हयांचा ते दौरा करणार आहेत.