Maharashtra Politics: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली असून, मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला तगडे आव्हान देण्यासाठी भाजपने कसून तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून ‘जागर मुंबईचा’ मोहीम हातात घेण्यात आली असून, यावेळी घेण्यात आलेल्या सभेत भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सडकून टीकास्त्र सोडले. हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम, उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मुंबईच्या विकासाची मारेकरी आहे, या शब्दांत निशाणा साधला.
शिवप्रतापदिनाच्या वेळी अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने केले. मात्र शिवसेनेच्या मुखपत्रात त्याची बातमी नव्हती, पण कंगना राणावतचे घर पाडले तेव्हा ठसठशीत बातमी होती. असे हे खोटे हिंदुत्ववादी आहेत, असा टोला भातखळकर यांनी लगावला. स्वतःला हिंदुत्वाचे, मराठीचे आणि मुंबईचे ठेकेदार मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंदू समाजात आणि मुंबईतील जनतेत फूट पाडण्याचे काम सुरू केले आहे. त्यांनी मुंबईच्या विकासात खोडा घातला असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी करून मुख्यमंत्रिपद मिळवले
उद्धव ठाकरे यांचे कर्तृत्व असे आहे की, त्यांच्या नावातून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव हटवायला हवे. उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी करून मुख्यमंत्रिपद मिळवले. मुंबई मेट्रोच्या वाढत्या खर्चाला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. मुंबईतील अनेक प्रकल्प रोखण्याचे काम उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी केले. कोणताही व्यवसाय न करता उद्धव ठाकरे यांची संपत्ती कोट्यवधी रुपये कशी झाली, महापालिकेतून येणारे खोके बंद झाल्यामुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत, अशी बोचरी टीका अतुल भातखळकर यांनी केली.
दरम्यान, घराणेशाहीचा फायदा एका विशिष्ट घराण्याला झाला. मुंबई महापालिकेत तीन लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केवळ एका कुटुंबामुळे झाला. लांगुलचालन, भ्रष्टाचार, तुष्टीकरण याविरोधात आपल्याला संघर्ष करावा लागेल, असे आवाहन चारकोपचे आमदार योगेश सागर यांनी यावेळी बोलताना केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"